
सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची खास पोस्ट; म्हणाल्या...
‘बिग बॉस मराठी ५’ चा आज ग्रँड फिनाले पार पडला. टॉप ६ स्पर्धकांमधून सुरज चव्हाण याने आपला जलवा दाखवत या सीझनची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली आहे. गोलिगत सुरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी ५’ चा विजेता झाल्यानंतर सोशल मीडियासह सर्वत्र त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खास सुरज चव्हाणसाठी इन्स्टाग्राम पोस्ट लिहित त्याचे कौतुक केले आहे.
हे देखील वाचा – केदार शिंदेने केली ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची घोषणा, हिरो असणार सूरज चव्हाण
पोस्ट शेअर करत सुप्रिया सुळे म्हणतात, “कलर्स मराठी या वाहिनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’या रियॅलिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रिलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो.”
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. तर उपविजेता अभिजीत सावंत झाला आहे. सूरजला 14 लाख 60 हजार रुपयांचा चेक मिळाला असून बिग बॉस मराठीची ट्रॉफी मिळाली आहे. त्याशिवाय, पु.ना.गाडगीळ आणि सन्स लिमिटेड तर्फे दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि Tunwal E Motors limited तर्फे बाईक. महाराष्ट्राच्या लाडक्या रितेशने विजेत्याची घोषणा केली आहे. खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत राहिला.
हे देखील वाचा : अभिजित सावंतला मिळाला ‘गोलीगत धोका’, सूरजने पटकावली ‘बिग बॉस मराठी ५’ ची ट्रॉफी
‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्याने स्वत:चं वेगळेपण दाखवलं. त्याने वाद घातले, राडे केले. पण त्याहीवेळी त्याने स्वत:ची बाजू उत्तम पद्धतीने राखली. प्रत्येक टास्क त्याने डोकं लावून खेळला म्हणूनच तो इथवर पोहोचला आणि या पर्वाचा विजेताही ठरला. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये सुपर ६ स्पर्धक होते. त्यामध्ये पहिली स्पर्धक म्हणून जान्हवी किल्लेकर, दुसऱ्या क्रमांकावर अंकिता प्रभु वालावलकर, तिसऱ्या क्रमांकावर डीपी दादा म्हणजेद धनंजय पोवार घराबाहेर गेला. त्यानंतर टॉप ३ मध्ये निक्की तांबोळी घराबाहेर गेली आहे.
ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरजने प्रेक्षकांचे आभार मानले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या गाजलेल्या पर्वाचा महाविजेता सूरज चव्हाण म्हणाला,”हे सगळं स्वप्नवत आहे माझ्यासाठी… माझं स्वप्न पूर्ण झालंआहे. बिग बॉस मराठी’साठी विचारणा होताच मी लगेचच होकार दिला होता. या घराने मला अनेक गोष्टी शिकवल्या. एक चांगला माणूस बनण्याचा मी प्रयत्न केला. प्रेक्षकांना मी भावलो. रसिक प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच ‘बिग बॉस मराठी’चा मी महाविजेता ठरलोय. सर्वच प्रेक्षकांचे मनापासून खूप-खूप आभार. या मंचाने मला खूप काही दिलंय. मी आयुष्यभर प्रेक्षकांचा ऋणी राहीन.”