अभिजित सावंतला मिळाला 'गोलीगत धोका', सूरजने पटकावली 'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी
प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला आहे… बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील विजेत्याचं नाव समोर आलं आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. तर उपविजेता अभिजीत सावंत झाला आहे. सूरजला 14 लाख 60 हजार रुपयांचा चेक मिळाला असून बिग बॉस मराठीची ट्रॉफी मिळाली आहे. त्याशिवाय, पु.ना.गाडगीळ आणि सन्स लिमिटेड तर्फे दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि Tunwal E Motors limited तर्फे बाईक. महाराष्ट्राच्या लाडक्या रितेशने विजेत्याची घोषणा केली आहे.
खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत राहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्याने स्वत:चं वेगळेपण दाखवलं. त्याने वाद घातले, राडे केले. पण त्याहीवेळी त्याने स्वत:ची बाजू उत्तम पद्धतीने राखली. प्रत्येक टास्क त्याने डोकं लावून खेळला म्हणूनच तो इथवर पोहोचला आणि या पर्वाचा विजेताही ठरला. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये सुपर ६ स्पर्धक होते. त्यामध्ये पहिली स्पर्धक म्हणून जान्हवी किल्लेकर, दुसऱ्या क्रमांकावर अंकिता प्रभु वालावलकर, तिसऱ्या क्रमांकावर डीपी दादा म्हणजेद धनंजय पोवार घराबाहेर गेला. त्यानंतर टॉप ३ मध्ये निक्की तांबोळी घराबाहेर गेली आहे.
दोघांनीही शेवटी बिग बॉस मराठीच्या घरामधून जाताना दिवे बंद करून पुढच्या प्रवासासाठी निघाले. ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरजने प्रेक्षकांचे आभार मानले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या या गाजलेल्या पर्वाचा महाविजेता सूरज चव्हाण म्हणाला,”हे सगळं स्वप्नवत आहे माझ्यासाठी… माझं स्वप्न पूर्ण झालंआहे. बिग बॉस मराठी’साठी विचारणा होताच मी लगेचच होकार दिला होता. या घराने मला अनेक गोष्टी शिकवल्या. एक चांगला माणूस बनण्याचा मी प्रयत्न केला. प्रेक्षकांना मी भावलो. रसिक प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच ‘बिग बॉस मराठी’चा मी महाविजेता ठरलोय. सर्वच प्रेक्षकांचे मनापासून खूप-खूप आभार. या मंचाने मला खूप काही दिलंय. मी आयुष्यभर प्रेक्षकांचा ऋणी राहीन”.
७० दिवसांपूर्वी म्हणजेच २८ जुलैपासून सुरु झालेला हा खेळ कधी अंतिम टप्प्यात आला काही कळलंच नाही. गेल्या अनेक दिवसांपासून घरात स्पर्धकांची आपआपसातील स्पर्धा, क्षुल्लक कारणावरून झालेले एकमेकांमधील भांडणं, त्यातून झालेली मैत्री आणि प्रेम या सर्वांनीच प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन केले. यावेळी, बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची सुरूवात होस्ट रितेश देशमुखच्या परफॉर्मन्सने झाली. त्याच्या डान्सने सर्वांचेच मन जिंकले आहे. गेले दोन आठवडे ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश भाऊंची कमतरता जाणवली होती. पण या महाअंतिम सोहळ्याला त्यांनी ही सर्व कसर भरून काढली. आपल्या हटके स्टाईलने त्यांनी महाअंतिम सोहळ्याची शोभा वाढवली. या शिवाय, अभिजीत सावंत – सूरज चव्हाण, निक्की तांबोळी – जान्हवी किल्लेकर आणि धनंजय पोवार – अंकिता वालावलकरच्या डान्सने सगळ्यांचेच लक्ष वेधले. त्यासोबतच, अरबाज पटेल, वैभव आणि इरिनाच्या आणि आई तुळजाभवानीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पूजा काळेनेही घरात डान्स करत सर्वांचेच लक्ष वेधलेय.