हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेची अक्षय कुमारने कशी घेतली काळजी ? स्वत: अभिनेत्याने सांगितला रुटिन
अभिनेता श्रेयस तळपदेला गेल्या वर्षी हार्ट अटॅक आला होता. त्यावेळी श्रेयस ‘वेलकम टू जंगल’ च्या शुटिंगमध्ये व्यग्र होता. चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानच अभिनेत्याच्या छातीत दुखू लागले होते. त्यानंतर अभिनेत्यावर हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी सर्जरी (Angioplasty surgery) करण्यात आली. त्यानंतर अभिनेता एकदम ठणठणीत बरा झाला आहे. सध्या श्रेयस सोशल मीडियावर कंगना रणौतच्या ‘इमरजन्सी’ सिनेमामुळे चर्चेत आला आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. नुकतंच अभिनेत्याने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अभिनेत्याने अँजिओप्लास्टी सर्जरी केल्यानंतरच्या काळामध्ये अक्षय कुमारने त्याची काळजी घेतली.
अमोल परचुरे यांना दिलेल्या मुलाखतीत श्रेयस तळपदेनी सांगितले की, “अक्षय कुमारने शुटिंगच्या पहिल्या दिवसापासूनना त्याने मला साधरणत: त्याच्या ताब्यात घेतलं होतं. माझ्या जेवणा- खाण्याच्या आणि वर्कआऊटच्या सवयी त्याने एक रुटिन सेट करून दिलं होतं. तो मला दररोज सकाळी ७: ३० च्या दरम्यान नाश्ता वैगेरे आणून द्यायचा. त्यापूर्वी तो वर्कआऊट वैगेरे करायचा. विशेष म्हणजे तो सुद्धा माझ्यासोबत नाश्ता करायचा आणि जेवणही त्याच्या टीमसोबत एकत्र करायचो. तो माझ्यासाठी जेवण आणि नाश्ता वैगेरे वेगळं करून घ्यायचा. त्यामध्ये सॅलेड्स वैगेरे वैगेरे असायचे.”
“आम्ही दुपारचं जेवण १२:३०च्या दरम्यान करायचो. तर रात्रीचं जेवणही आम्ही संध्याकाळी ६:३० ते ७ च्या दरम्यानच करायचो. जे सकाळचं जेवण असायचं, तसंच संध्याकाळचंही जेवण असायचं. मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता पुन्हा नाश्त्याला भेटायचो. अक्षयने मला एक रुटिन सेट करुन दिलं होतं आणि त्याने सेट करून दिलेलं रुटिन माझ्यासाठी उत्तम होतं. मला त्याची खूप मदत झाली.” श्रेयसने मुलाखतीत अक्षय कुमारचे आभार मानले. श्रेयस आणि अक्षय कुमार सध्या ‘वेलकम टू जंगल’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.