फोटो सौजन्य - Social Media
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी सुपरस्टार अंकुश चौधरी याने ऐतिहासिक चित्रपट छावाच्या विशेष शोचे आयोजन केले. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित असून, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देणारा आहे. विशेष शोच्या निमित्ताने मराठी भाषा आणि इतिहास जपण्याचा संदेश अंकुश चौधरीने दिला.
या खास खेळाला चित्रपटातील कलाकार आणि तांत्रिक टीम उपस्थित होती. ‘अंताजी’ची भूमिका साकारणारे आशिष पाथोडे, ‘धनाजी’ची भूमिका साकारणारे शुभंकर एकबोटे, पटकथा लेखक ओमकार महाजन, उन्मन बाणकर, शिवगर्जना प्रतिष्ठानचे तलवारबाजी प्रशिक्षक भार्गव शेलार, कला दिग्दर्शक बाळकृष्ण पाटील आणि रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यांच्यासोबतच विविध वयोगटातील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक, मध्यमवयीन प्रेक्षक, युवक तसेच विद्यार्थी या शोसाठी आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर बोलताना अंकुश चौधरी म्हणाला, “मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने छावाचा खास शो आयोजित करण्यासाठी यापेक्षा उत्तम दिवस असू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि पराक्रम हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. इतिहासातील हे सुवर्णपान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपट आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी या विशेष खेळाचे आयोजन करण्यात आले.”
छत्रपती संभाजी महाराज हे केवळ शूर योद्धे नव्हते, तर ते अत्यंत बुद्धिमान, व्यासंगी आणि दूरदृष्टी असलेले शासक होते. त्यांच्या चरित्रावर आधारित हा चित्रपट तरुणांना प्रेरणा देणारा आहे. त्यामुळेच मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने या ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आनंद घेत प्रेक्षकांनी इतिहासाचे स्मरण केले.
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. इतिहास, परंपरा आणि वारसा जपण्यासाठी मराठी चित्रपट, नाटके आणि साहित्याला चालना देणे आवश्यक आहे. अशा विशेष शोच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रसार होत असून, तरुणाईला आपल्या इतिहासाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंकुश चौधरीच्या या उपक्रमाने मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह अधिकच वाढवला आहे.