४० वर्षात ५४० चित्रपटात काम करणाऱ्या अनुपम खेर यांनी कमावलीय कोट्यवधींची संपत्ती, जाणून घ्या हिट चित्रपटांबद्दल
आज अभिनेत्याने वयाच्या सत्तरीत पदार्पण केले आहे. अनुपम खेर यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये ५००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. केवळ हिंदीच नव्हे तर, त्यांनी इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त थोडक्यात त्याच्या नेटवर्थबद्दल आणि चित्रपटांबद्दल माहिती जाणून घेऊया…
अनुपम खेर यांचा जन्म ७ मार्च १९५५ रोजी शिमल्यातील एका काश्मिरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील पुष्करनाथ खेर हे वनविभागात लिपिक होते. तर, त्यांची आई दुलारी खेर या गृहिणी आहेत. अनुपम खेर हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत. ते गेल्या ४० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. अनुपम खेर यांनी आपल्या फिल्मी करियरची सुरुवात १९८४ साली रिलीज झालेल्या महेश भट्ट दिग्दर्शित ‘सारांश’ चित्रपटातून केली आणि त्यांना यशही मिळालं. अनुपम खेर यांनी अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. प्रेमकथा, तीव्र भूमिका आणि कौटुंबिक नाटकांमधून, अनुपम यांना नेहमीच त्यांच्या कामाची प्रशंसा मिळाली आहे. चित्रपटांमध्ये वडिलांची भूमिका असो, मित्राची भूमिका असो, राजकारणी असो किंवा अधिकाऱ्याची भूमिका असो, अनुपम प्रत्येक भूमिकेत आपले सर्वस्व अर्पण करतो. याशिवाय, तो विनोदी चित्रपटांमध्येही अतुलनीय आहे. भूमिका कोणतीही असो, अनुपम त्याच्या अभिनयाने त्यात जीवंतपणा आणतात.
पदार्पण केल्यापासून आतापर्यंत त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. गेल्या ४० वर्षात अनुपम खेर यांनी जवळपास ५४० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनुपम खेर यांनी सर्व भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यांनी सारांश, राम लखन, हम आपके है कोन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, कहो ना प्यार है, विवाह, अ वेडनेस डे, स्पेशल २६, ॲन ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, द काश्मीर फाईल्स आणि इमरजन्सी अशा वेगवेगळ्या चित्रपटांतून अभिनयाची चुणूक त्यांनी प्रेक्षकांना दाखवली.
बिग बॉसच्या घरातील सदस्याची जुळून आल्या रेशीमगाठी! अनुराग-रितिकाचं जमलंय हा…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुपम खेर एका चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये मानधन स्वीकारतात. त्यांची एकूण ४०५ कोटींची असून वर्षभराची कमाई ३० ते ४० कोटी रुपये आहे. चार दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अनुपम खेर यांच्या नावावर अनेक कामगिरी आहेत. भारतीय चित्रपट आणि कला क्षेत्रातील त्यांनी योगदानाबद्दल, भारत सरकारकडून त्यांना २००४ मध्ये पद्मश्री आणि २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांना ‘डॅडी अँड आय डिड नॉट किल गांधी’ या चित्रपटांसाठी ‘विशेष ज्युरी राष्ट्रीय पुरस्कार’ही मिळाला. याशिवाय, अनुपमने त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ जिंकला. ‘राम लखन’साठी ‘सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार’, डॅडीसाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ (समीक्षक), ‘डर’साठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’साठी ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ असे ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळाले. याशिवाय, अनुपमने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्या’चा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कारही जिंकला.