
'बाई तुझ्यापायी' रिव्ह्यू (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आजही अनेक गोष्टीत गावागावांमध्ये अगदी शहरांमध्येही जुनाट परंपरा जपल्या जातात आणि ZEE5 वर प्रदर्शित झालेली मराठी सिरीज ‘बाई तुझ्यापायी’ ही समाजातील जुनाट परंपरावर भाष्य करून त्यावर प्रश्न उपस्थित करणारी आहे. सिक्स्टीन बाय सिक्स्टी-फोर प्रॉडक्शन निर्मित आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका एका किशोरवयीन मुलीच्या धैर्य, शिक्षण आणि संघर्षाची कथा सांगते.
मुलगी मोठी होत असताना होणारे बदल
घरात जेव्हा मुलगी मोठी होत असते तेव्हा तिच्या शरीरात घडणारे नैसर्गिक बदल आणि त्यानंतर त्या मोठ्या बदलातून जात असताना तिच्यावर समाजाकडून येणारी बंधनं आणि त्या विरोधात ही मुलगी कशी उभी राहते आणि कशा प्रसंगांना सामोरी जाते याबाबत भाष्य करणारी ही सिरीज म्हणजे समाजाचा एक प्रकारे डोळे उघडणारीच आहे. वयात येणाऱ्या प्रत्येक मुलीने आणि तिच्या पालकांनी खरं तर ही सिरीज पहायला हवी.
सध्याच्या परिस्थितीतही सामाजिक भान आणि समाजातील जुनाट परंपरा कशा जपल्या जातात आणि त्या मोडणं किती आवश्यक आहे याबाबत अगदी तंतोतंत भाष्य या सिरीजमधून कऱण्यात आले आहे.
पुष्कर जोगने भारताला ठोकला रामराम? UAE ला झाला शिफ्ट, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय
काय आहे कथा?
1990 च्या दशकातील ‘वेसाच्या वाडगाव’ या गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा आहे. ही कथा लक्ष्मी आजी आपल्या नातीला अहिल्याला (साजिरी जोशी) सांगत आहे आणि अहिल्याची ही गोष्ट समाजातील मुलींंना खरंच सांगण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे.
या सिरीजमधील नायिका अहिल्या ही समाजातील अंधश्रद्धा, परंपरा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवत असल्याचे दाखविण्यात आले असून शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी लढा देते. संपूर्ण गावामध्ये बदल घडण्याचं काम ती करते. साजिरीने हे पात्र अक्षरशः जगलं आहे. ही मुलगी समाजाचं प्रतिनिधित्व करत असून समाजाची बंधनं झुगारण्याचं काम करताना या सिरीजीमध्ये दाखविण्यात आली आहे. साजिरीसह अभिनेत्री क्षिती जोग, सिद्धेश धुरी आणि शिवराज वैचळ यांच्या प्रमुख भूमिका आहे आणि दिग्दर्शक धर्माधिकारी यांनी सक्षम स्त्री चं प्रभावी घडवलं आहे.
समाजाची कथा
मुलगी वयात आल्यानंतर अर्थात मासिक पाळी चालू झाली की, तिचं लग्न लाऊन देण्याची परंपरा या गावात असून वेसाईच्या गाभाऱ्यात केवळ कुमारिका प्रवेश करू शकतात असे दाखविण्यात आले आहे. जर ही बाब लपवली तर मुलींचे केस काढण्यात येतात असा दंड दिला जातो आणि तिच्यावर बहिष्कारही टाकण्यात येतो. यामुळेच मुलींचे लग्नही गावातल्या गावातच लाऊन देण्यात येत असून वेस ओलांडू नये यासाठी तरतूद करण्यात येते. दरम्यान डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत असणाऱ्या साजिरीला मात्र या सगळ्या गोष्टींना सामोरं जाताना संघर्ष करावा लागतो आणि पाळी सुरू झाल्यानंतर तिला कोणत्या गोष्टी त्रासदायक ठरतात, मनात रुजलेल्या रुढीपरंपरा ओलांडताना तिला काय त्रास होतो, तिचे द्वंद्व हे सर्व पाहताना प्रेक्षक म्हणून तुम्ही गुंतून राहता आणि अंगावर काटा येतो.
फिनाले आधीच Bigg Boss 19 च्या विजेत्यांचे नाव आले समोर, ही बघा TOP 5 फायनलिस्टची यादी
साजिरीचे अफलातून काम
साजिरी जोशीचा हा दुसरा चित्रपट असून तिच्या अभिनयाचा कस लागला आहे. अत्यंत सुंदर आणि सहज असे काम तिने केले असून हे पात्र खूपच चांगल्या पद्धतीने पेलले आहे. क्षिती जोगची तिला पुरेपूर साथ मिळाली आहे. शिक्षण आणि आत्मविश्वास हे महिलांचे स्वातंत्र्य आहे हेच खरं आहे आणि तेच साजिरीने अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवले आहे. समाजाला एक प्रकारे आरसा दाखविण्याचे काम या सिरीजमधून करण्यात आले आहे. या सिरीजचा प्रवास प्रेक्षकांना बरंच सामाजित भान देऊन जातो हे मात्र नक्की!