"मी स्वत:ला अस्सल महाराष्ट्रीयन बोलायला संकोचते..." भर स्टेजवर सोनाली बेंद्रे असं का म्हणाली ?
काल अवघ्या राज्यात “मराठी भाषा गौरव दिन” साजरा करण्यात आला. वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त मनसेकडून दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात अभिजात पुस्तक प्रदर्शन आणि एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते, याशिवाय गायिका आशा भोसले, संगीतकार आणि जावेद अख्तर, पद्मश्री पुरस्कार विजेते अशोक सराफ, आशुतोष गोवारिकर, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, विक्की कौशल, लक्ष्मण उतेकर आणि शर्वरी वाघ या कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यातल्या प्रत्येक कलाकारांनी स्टेजवर आपल्या कविता सादर केल्या. पण आता सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री सोनाली बेंद्रेने केलेल्या कवितेची चर्चा होत आहे.
‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ सांगणार लग्नानंतरची गोष्ट, चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
कवी विंदा करंदीकर यांच्या ‘घेता’ या कवितेला सादर करत असताना आवाजातील चढ- उतार, शब्दांचा लहेजा अतिशय सुरेखरित्या हाताळत कविचा प्रत्येक शब्द अतिशय प्रत्ययकारीरित्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सोनालीनं केला.
“देणार्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भिमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी
देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे.”
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने स्टेजवर येत मराठीतून भाषण करत आणि कविता सादर करत सर्वांचं मन जिंकलं. ती म्हणाली, “नमस्कार! आज इथे महाराष्ट्राच्या अनेक दिग्गज व्यक्तींसमोर मी उभी आहे. माझी गणना इथे होणं ही माझ्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. पण सुरुवातीलाच एक कबुली देते. मी स्वत:ला अस्सल महाराष्ट्रीयन म्हणायला थोडीशी संकोचते. कारण माझा जन्म जरी बेद्रेंची सोनाली म्हणून झाला असेल तरी माझे वडील कायम महाराष्ट्राबाहेर पोस्टिंगवर असल्यामुळे माझं संपूर्ण बालपण भारतभर फिरण्यामध्ये गेलं. आम्ही इतक्या वेळा घरं बदलली की घरचा पत्ता पूर्ण लिहिण्याच्या आधी आम्ही पुढच्या शिफ्टिंगचा विचार करायचो.”
भाषणामध्ये सोनाली पुढे म्हणाली, “पण या सगळ्यात एक गोष्टीत कोणतीही तडजोड नव्हती तो म्हणजे आमच्या घरातला मराठी बाणा. कुठेही राहिलो, कितीही भाषा शिकल्या, कुठल्याही वेगवेगळ्या भाषेचे मित्रमैत्रिणी केल्या तरीही आमच्या घरात मात्र मराठीच बोललं जायचं. त्यामुळे १०० टक्के महाराष्ट्रीयन म्हणू शकत नसले तरी मराठी ही माझ्यासाठी घर आहे. सुरक्षित, उबदार असं घर. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर लहानपणी मराठी साहित्याशीही फारशी गोडी लागली नाही. नंतर हिंदी चित्रपटात आले. तिथेही मराठी लेखन, वाचन कमीच झालं. तरी काही गोष्टी मनाच्या तळाशी घट्ट रुजून बसतात. विंदा करंदीकरांची देणाऱ्याने देत जावे ही कविता त्यापैकी एक आहे. ही कविता म्हणजे फक्त शब्द नाहीत. तर ती मनाची अवस्था आहे. जगण्याचं दृष्टिकोन आहे. जसं जसं आयुष्य समृद्ध होत जातं तसं या कवितेचे वेगवेगळे पदर उलगडत जातात. म्हणूनच आज मला तुमच्यासमोर ही कविता सादर करायची आहे आणि मला खात्री आहे हे शब्द तुमच्या शब्दात नक्कीच घर करतील.”
SS Rajamouli: एसएस राजामौलीचे करिअर उद्ध्वस्त ? जवळच्या मित्राने सुसाईड नोटमध्ये केले गंभीर आरोप!
अभिनेत्रीने केलेल्या ह्या भाषणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. खरंतर, अनेक वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे एकत्र दिसले. एकाच फ्रेममध्ये दिसल्यानंतर त्यांचे सध्या काही रिल्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.