
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘भूल भुलैया 3’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा ‘रूह बाबा’च्या भूमिकेत परतत असताना, विद्या बालन पुन्हा मंजुलिकाच्या भूमिकेत तिचा वाडा रूह बाबाकडून वाचवताना दिसणार आहे. मात्र, ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे यावेळी एक नाही तर दोन मंजुलिका ‘रूह बाबा’ला अडचणीत टाकताना दिसणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित केला आहे. ज्याला आतापर्यंत 5 कोटी 50 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कोणत्याही चित्रपटाच्या ट्रेलरमधील हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. आताही हा ट्रेलर यूट्यूबवर तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. आता अलीकडेच, चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी चित्रपटाच्या क्लायमॅक्सबद्दल असा खुलासा केला आहे, ज्याबद्दल चित्रपटाच्या स्टारकास्टलाही माहिती नाही आहे.
चित्रपटासाठी दोन वेगवेगळे क्लायमॅक्स शूट करण्यात आले आहे
अनीस बज्मीने नुकतेच भूल भुलैयाच्या दोन क्लायमॅक्सच्या शूटिंगबद्दल सांगितले. ते इंडिया टीव्हीला मुलाखत देताना म्हणाले की, “लोकांना चित्रपट पाहताना धक्का बसणार आहे. आम्ही प्रेक्षकांसाठी एक चांगला आणि सुंदर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही दोन क्लायमॅक्स शूट केले आहेत, ज्याबद्दल प्रॉडक्शनलाही माहिती नाही. क्लायमॅक्स मी चित्रपटात वापरणार आहे.” असे दिग्दर्शक अनीस बज्मी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, ‘चित्रपटाचा योग्य शेवट काय आहे हे फक्त मला आणि टीमच्या तीन सदस्यांनाच माहीत आहे. आम्ही सुरुवातीला फायनल क्लायमॅक्स शूट केला होता, पण मी टीमला पुन्हा बोलावलं आणि म्हटलं की मला मजा येत नाहीये, आपण पुन्हा करू. हे आवश्यक आहे की नाही याबद्दल टीमलाही आश्चर्य वाटले, पण खरे सांगायचे तर चित्रपटाचा खरा शेवट त्यांच्यापासून लपवण्यासाठीच होता.” असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा- बॉक्स ऑफिसवर ‘Vicky Vidya Ka Woh Wala Video’ची तुफान कमाई, आलिया भट्टच्या ‘Jigra’ची परिस्थिती काय
15 पानांची स्क्रिप्ट स्टारकास्टला देण्यात आली नाही
दिग्दर्शक अनीस बज्मी यांनीही त्यांच्या मुलाखतीत सांगितले की, त्यांनी स्क्रिप्टची शेवटची 15 पाने कलाकारांना दिली नाहीत, कारण त्यांना प्रेक्षकांसाठी तसेच कलाकारांसाठी एक गूढ वातावरण निर्माण करायचे होते. जेव्हा ते त्याच्या चित्रपटाच्या दोन्ही क्लायमॅक्सचे शूटिंग करत होते तेव्हा सेटवर मोजकेच लोक उपस्थित होते. ‘भूल भुलैया 3’ च्या दिग्दर्शकाने पुढे खुलासा केला की तृप्ती डिमरी, कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांच्यासह चित्रपटाच्या स्टारकास्टने हा चित्रपट केवळ प्री-क्लायमॅक्सपर्यंत पाहिला आहे. दाखवण्यात आलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरवरून प्रेक्षकांना थिएटरमध्ये एक मोठं सरप्राईज मिळणार असल्याचे दिग्दर्शकाच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट सिंघम अगेनला टक्कर देणार आहे.