(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर लोकप्रिय विनोदी कलाकार आणि अभिनेता कपिल शर्माची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी कपिलची सुरक्षा वाढवली आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर दोनदा हल्ला करण्यात आला आणि गोळीबारही झाला आहे. गेल्या गुरुवारीही कपिलच्या कॅफेवर दुसऱ्यांदा गोळीबार झाला होता. आता या वाढत्या प्रकरणामुळे पोलिसांनी अभिनेत्याची सुरक्षा देखील वाढली आहे.
धमक्यांनंतर अभिनेत्याची वाढवली सुरक्षा
कपिल शर्माला मिळत असलेल्या सततच्या धमक्या लक्षात घेता, विनोदी कलाकार कपिल शर्माच्या सुरक्षेबाबत निर्णय घेण्यात आला आहे आणि मुंबई पोलिसांनी विनोदी कलाकाराची सुरक्षा वाढवली आहे. कपिल शर्मा सध्या त्याच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मुळे चर्चेत आहे, जो दर शनिवारी नेटफ्लिक्सवर प्रसारित होतो.
कपिलला मिळालेल्या धमकीशी सलमान खानचा संबंध
अभिनेता सलमान खानला बिश्नोई टोळीकडून अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. सलमान खान ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या पहिल्या भागात दिसला होता. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या एका सदस्याने एक ऑडिओ जारी करून धमकी दिली की सलमान खानसोबत काम करणाऱ्या कोणालाही तो मारेल. आणि म्हणून कपिलला देखील धमकी मिळाल्याचे समजले आहे.
अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
कॅफेवर केला दोनदा हल्ला
गेल्या महिन्यात, १० जुलै रोजी कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर गोळीबार करण्यात आला होता. याचा व्हिडिओही गोळीबार करणाऱ्या लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. कॅफेवर १० ते १२ राउंड गोळीबार करण्यात आला होता. शेवटच्या गोळीबाराची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने घेतली होती. हरजीत सिंग लड्डीचा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश आहे आणि तो बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित आहे. आता लॉरेन्स बिश्नोई टोळीने नवीन हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. कपिलच्या कॅनडास्थित ‘कॅप्स कॅफे’मध्ये झालेल्या दुसऱ्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा असल्याचा दावा करणारा गँगस्टर गोल्डी ढिल्लन याने स्वीकारली. गोल्डीने सोशल मीडिया पोस्टद्वारे हा दावा केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.