(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम हे नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस राहिले आहेत. अभिनेत्याची संपूर्ण कारकीर्द ही राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चर्चेत राहिली आहे. कवी सौमित्र या नावाने देखील किशोर कदम यांना ओळखले जाते. नेहमीच आपल्या कामामुळे आणि चित्रपटांमुळे चर्चेत असलेल्या किशोर कदम यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अभिनेता यावेळी एका मोठया अडचणीत अडकला आहे. तसेच ही मोठी अडचण त्यांचे राहते घर असल्याचे समजले आहे. अभिनेत्याने मुख्यमंत्र्यांकडे मदत देखील मागितली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊ.
अभिनेते किशोर कदम यांचं मुंबईतील राहत घर अडचणीत आले आहे. स्वतःच्या डोक्यावरचं छप्पर वाचवण्यासाठी किशोर कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आहे. किशोर कदम यांच्यासह इतर 23 जणांची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावर या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती शेअर करून त्यांच्याकडे मदत मागितली आहे.
किशोर कदम हे अंधेरी येथील हवा मेहेल सोसायटी, चकाला येथे राहणारे रहिवासी आहेत. परंतु त्यांचे आता हेच राहते घर त्यांच्या हातातून निसटत चाललं आहे. किशोर कदम यांनी फेसबुक पोस्ट लिहित संपूर्ण प्रकार सांगितला आहे. किशोर कदम यांनी शेअर केलेल्या नोटमध्ये लिहिले, “नमस्कार ! मी किशोर कदम. गेली तीस पस्तीस वर्ष प्रामुख्याने मराठी आणि हिंदी रंगमंच आणि सिनेमात काम करत असून मला महाराष्ट्रात कवी सौमित्र म्हणूनही ओळख आहे आणि या दोन्ही क्षेत्रात मला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.”
अभिनेत्याने पुढे लिहिले, “महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते ,मंत्री ,मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचे आवाहन करीत आहे. मेजॉरिटीच्या नावा खाली मी राहात असलेल्या सोसायटीमध्ये,रीडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर तेवीस सभासदांची राहाती घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे. कमिटी मेम्बर्सनी काही महत्वाची कागदपत्र , अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चाकाला सारख्या अत्यंत प्राईम विभागात 33(11) आणि 33(12)B या DCPR खाली आमची इमारत SRA/स्लम डेव्हेलपमेंट खाली डेव्हलप करण्याचे ठरवले असल्याचे कालच आमच्या लक्षात आले आहे.”
टायगर श्रॉफच्या ‘Baaghi 4’ चा टीझर प्रदर्शित, टायगर श्रॉफ दिसणार अॅक्शन मोडमध्ये
किशोर कदम यांनी पोस्टच्या शेवटी लिहिले आहे की, “या गंभीर समस्येकडे शासनाला तातडीने लक्ष घालण्याची कळकळीची विनंती, मी सर्व सामान्य माणसांतर्फे करीत आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यममंत्री फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी, तसेच सहकारमंत्री दिलीप वळसेपाटीलजी आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक जनतेला एका कलावंताचे घर वाचवण्याचे आवाहन करीत आहे.” असे म्हणून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
किशोर कदम यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांचा ‘जारण’ हा मराठी चित्रपट नुकताच रिलीज झाला होता. ज्यात त्यांनी एका डॉक्टरची भूमिका साकारली. त्याचबरोबर ‘अंधार माया’ या मराठी हॉरर वेब सीरिजमध्येही ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी आजवर मराठी चित्रपट, आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले आहे.