Aditya Sarpotdar दिग्दर्शित 'Thamma' चा Trailer प्रदर्शित (Photo Credit- X)
Thamma Trailer Release: रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांच्या बहुप्रतिक्षित ‘थामा’ (Thamma) या चित्रपटाचा थरारक ट्रेलर शुक्रवारी प्रदर्शित झाला. रोंगटे उभे करणारा हा ट्रेलर मुंबईतील एका भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला. मॅडॉक हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील हा पाचवा चित्रपट आहे, ज्यामध्ये यापूर्वी ‘स्त्री’, ‘भेड़िया’, ‘मुंज्या’ आणि ‘स्त्री २’ सारखे सुपरहिट चित्रपट रिलीज झाले आहेत. ‘थामा’ च्या ट्रेलरने व्हॅम्पायर, खूनी खेळ आणि कॉमेडीचा एक अनोखा संगम दाखवत प्रेक्षकांना आकर्षित केले आहे.
२ मिनिटे ५४ सेकंदांच्या या व्हिडिओची सुरुवात रश्मिका मंदानाच्या आवाजाने होते, जी म्हणते, “तुम्ही वैताल आहात, तुम्हाला पृथ्वी आणि माणसांचे रक्षण करण्यासाठी बनवले आहे.” यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आवाजाची एंट्री होते. तो म्हणतो, “आजपासून आपण माणसांचे रक्त पिणार, नवीन वैताल तयार करणार, आपली सेना बनवणार आणि मी बनेल तुमचा थामा.” नवाजुद्दीनला एका गुहेत बंद केले जाते. हजारो वर्षांनंतर आयुष्मान खुराना तिथे पोहोचतो आणि तोदेखील व्हॅम्पायर बनतो. त्याचे शरीर सूर्यप्रकाशात जळू लागते आणि दात टोकदार होतात.
या चित्रपटात परेश रावल यांनी आयुष्मानच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. आपल्या मुलाची ही अवस्था पाहून ते पोलिसांकडे जातात आणि त्याला ‘सैतान’ म्हणतात. रश्मिका आयुष्मानला त्यांच्या वेगळ्या जगाबद्दल चेतावणी देते आणि त्यांच्यासोबत राहणे धोकादायक असल्याचे सांगते. यानंतर आयुष्मान आणि नवाजुद्दीन यांच्यात जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतो. यात अभिनेता सत्यराज कॉमेडीचा तडका देताना दिसतात.
‘थामा’ च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला निर्माते दिनेश विजान यांनी हजेरी लावली. त्यांच्यासोबत ‘स्त्री’ चित्रपटाची अभिनेत्री श्रद्धा कपूरही उपस्थित होती. श्रद्धाने सांगितले की, ‘२०१८ मध्ये ‘स्त्री’ रिलीज झाला तेव्हा तो इतका मोठा होईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती.’ या खास प्रसंगी, तिने मॅडॉक हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा नवीन लोगोही लाँच केला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आयुष्मान खुरानाही स्टेजवर आला.
OG Collection: पवन कल्याणच्या ‘OG’ने तोडला ‘सैयारा’चा रेकॉर्ड, पहिल्याच दिवशी एवढी कमाई
हा चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी हॉरर असून त्याचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. नीरेन भट्ट, सुरेश मॅथ्यू आणि अरुण फलारा यांनी याचे लेखन केले आहे, तर अमर कौशिक आणि दिनेश विजान यांनी याची निर्मिती केली आहे. चित्रपटातील मुख्य भूमिकेत आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना असून, त्यांच्यासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी, परेश रावल, सत्यराज आणि ‘पंचायत’ फेम फैजल मलिक (प्रल्हाद चा) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय, संजय दत्त, डायना पेंटी आणि विजय राज यांचाही चित्रपटात सहभाग आहे.
‘थामा’ मध्ये काही प्रसिद्ध कलाकारांचे कॅमिओ आणि स्पेशल गाणीही आहेत. वरुण धवन ‘भेड़िया’ चित्रपटातील भास्करच्या भूमिकेत कॅमिओ करताना दिसणार आहे. मलाइका अरोरा आणि नोरा फतेही यांची स्पेशल गाणीही चित्रपटात असतील. हा चित्रपट २१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.