फोटो सौजन्य - Social Media
श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची सांगड घालणारा ‘मी पाठीशी आहे’ हा चित्रपट २८ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, सेन्सॉर सर्टिफिकेट मिळण्यास विलंब झाल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणी चित्रपटाचे निर्माते मयूर अर्जुन खरात, ॲड. शुभांगी किशोर सोनवले, प्रमोद नंदकुमार मांडरे, शितल सोनावणे, ऋतुजा नरेंद्र कदम, अनिल गावंड आणि केतन कल्याणकर तसेच दिग्दर्शक पराग सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांची भेट घेऊन या संदर्भात आपली अडचण मांडली.
सेन्सॉर बोर्डकडून होणाऱ्या विलंबामुळे मराठी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड असावे, अशी मागणी अमेय खोपकर यांनी सरकारकडे केली आहे. तसेच त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सर्टिफिकेट देण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणावर बोलताना दिग्दर्शक पराग सावंत म्हणाले, “स्वामींच्या कृपेने हे घडत आहे. अमेय खोपकर आमच्या मदतीला धावून आले, याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. लवकरच प्रेक्षकांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहायला मिळेल.”
निर्माते मयूर अर्जुन खरात यांनीही सेन्सॉर बोर्डाच्या विलंबामुळे होणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “चित्रपटाची निर्मिती करताना आमची काही गणिते असतात. मात्र, सेन्सॉर सर्टिफिकेट न मिळाल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही सर्व कागदपत्रे वेळेवर दिली असूनही सहकार्य मिळाले नाही. अशा परिस्थितीत अमेय खोपकर सरांचे सहकार्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाची नितांत गरज आहे.”
‘मी पाठीशी आहे’ हा चित्रपट ऑफबीट प्रॉडक्शन आणि वेरा प्रॉडक्शनने निर्मित केला आहे. कथा, संकलन आणि दिग्दर्शन पराग अनिल सावंत यांनी केले असून पटकथा संजय नवगिरे आणि दिलीप परांजपे यांनी लिहिली आहे. संवाद लेखन संजय नवगिरे यांनी केले आहे, तर संगीत कबीर शाक्य यांनी दिले आहे. या चित्रपटात सक्षम कुलकर्णी, सतीश पुळेकर, अरुण नलावडे, सुहास परांजपे, वर्षा प्रभु, श्रीकांत पाटील, अश्विनी चवरे, प्रसाद सुर्वे, शितल सोनावणे, सूचित जाधव, श्रद्धा महाजन, राजवीर गायकवाड, वैष्णवी पोटे यांच्या भूमिका आहेत. विशेष पाहुणे म्हणून माधुरी पवार, संदेश जाधव आणि नूतन जयंत झळकणार आहेत.