फोटो सौजन्य - Social Media
कोक स्टुडिओ भारत या प्रतिष्ठित संगीत प्लॅटफॉर्मने आपल्या तिसऱ्या सीझनचे दुसरे गाणे ‘होलो लोलो’ लाँच केले आहे. हे गाणे आसामच्या मोरन समुदायातील फंदी (हत्ती प्रशिक्षक) यांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकते. लोकसंगीत व समकालीन साऊंड्स यांच्या फ्यूजनच्या माध्यमातून कोक स्टुडिओ भारत एका कालातीत परंपरेला संगीताच्या रूपात सादर करत आहे.
हे गाणे शंकूराज कोनवार आणि शाल्मली खोलगडे यांनी गायले आहे. यामध्ये हिंदीसोबतच आसामी भाषेचे मिश्रण आहे, जे फंदी आणि त्याच्या हत्तीसोबतच्या भावनिक नात्याला अधोरेखित करते. हत्ती हा फंदीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो आणि त्याच्या साथीदारासाठी कुरण शोधण्यासाठी तो महिनोनमहिने जंगलात फिरत असतो. या प्रवासात त्याच्या मनातील भावना या गाण्यातून व्यक्त होतात.
‘होलो लोलो’ हे गाणे पारंपरिक लोककथांना आधुनिक साऊंडस्केपच्या माध्यमातून नव्याने सादर करते. कोक स्टुडिओ भारताने या गाण्याद्वारे मोरन समुदायाच्या संस्कृतीला एक नवी ओळख दिली आहे. यामध्ये भावनिक सूर आणि आकर्षक दृश्यमानता यांचा उत्तम समन्वय आहे. गायक शंकूराज कोनवार म्हणाले, ‘‘होलो लोलो हे गाणे आमच्या सांस्कृतिक इतिहासाला मानवंदना आहे. कोक स्टुडिओ भारत प्रादेशिक संगीताला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करत आहे, ज्यामुळे स्थानिक कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करण्याची संधी मिळते.’’ शाल्मली खोलगडे म्हणाल्या, ‘‘लोकसंगीत हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. ‘होलो लोलो’ मध्ये लोकसंगीत आणि समकालीन साऊंड यांचे सुंदर मिश्रण आहे. या माध्यमातून पारंपरिक संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.’’
कोका-कोला इंडियाचे आयएमएक्स लीड शंतनू गंगाणे म्हणाले, ‘‘संगीत ही केवळ कला नसून ती आपल्या परंपरांचा वारसा पुढे नेण्याचे साधन आहे. ‘होलो लोलो’ हे गाणे आसामच्या संस्कृतीला नव्या रूपात सादर करते. कोक स्टुडिओ भारताच्या या प्रवासात आम्ही अधिक संगीत, अधिक कथा आणि अधिक आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत.’’ कोक स्टुडिओ भारत सीझन ३ हा भारताच्या सांस्कृतिक वैविध्याला संगीताच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न आहे. भावनिक संगीत आणि आकर्षक व्हिज्युअल्सच्या साहाय्याने हा सीझन लोककथांचे नव्याने सादरीकरण करतो. पुढील गाण्यांसाठी कोक स्टुडिओ भारतासोबत राहा!