
देवखेळ ही वेब सिरीज सध्या चर्चेचा विषय बनली आहे. Zee 5 वर ही सिरीज प्रदर्शित करण्यात आली आहे. प्रेक्षकांचा या सीरिजला मिळणार उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे या सिरीजची कथा! श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये असणारी भिंत, या सिरीजमध्ये दाखवण्यात आली आहे. या वेब सिरीजमधील सर्वात गूढ आणि चर्चेत असलेला पात्र म्हणजे शंकासुर. पौराणिक कथांमध्ये शंकासुर हा असुर म्हणून ओळखला जात असला, तरी कोकणात मात्र तो केवळ राक्षस नाही, तर लोकजीवनाचा अविभाज्य भाग मानला जातो. कोकणातील अनेक गावांमध्ये शंकासुराची लोककथा, दंतकथा आणि देवकथांमधून वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
कोकणी लोकसंस्कृतीत शंकासुर हा देवांचा विरोधक असला, तरी तो पूर्णतः दुष्ट नाही. अन्यायाविरुद्ध उभा राहणारा, प्रश्न विचारणारा आणि देवांच्या निर्णयांवर शंका घेणारा असा त्याचा स्वभाव दाखवला जातो. त्यामुळेच ‘शंका’ या शब्दाशी जोडलेला शंकासुर हा अंधश्रद्धेला आव्हान देणारा प्रतीकात्मक पात्र ठरतो.
सिरीजमध्ये शंकासुर हे पात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषेवर उभे आहे. देवावर अढळ विश्वास ठेवणाऱ्या समाजाला प्रश्न विचारायला लावणारा, परंपरांना तर्काच्या कसोटीवर तपासणारा शंकासुर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. त्यामुळेच तो असुर असूनदेखील कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय ठरतो.
कोकणातील ग्रामदेवता, जत्रा, नमन-खेळ, भारूड आणि लोककथांमध्ये शंकासुराचा उल्लेख आढळतो. काही ठिकाणी त्याला रक्षणकर्ता, तर काही ठिकाणी इशारा देणारे प्रतीक मानले जाते. देवखेळ वेब सिरीजने या लोकविश्वासांना आधुनिक कथानकात गुंफत श्रद्धा आणि विवेक यांचा संघर्ष प्रभावीपणे उलगडून दाखवला आहे. यामुळेच देवखेळ ही केवळ एक वेब सिरीज न राहता, कोकणाच्या लोकसंस्कृतीचा, श्रद्धांचा आणि प्रश्न विचारण्याच्या परंपरेचा आरसा ठरते.