मोठी बातमी! बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक राहुल फाजिलपुरियावर गुरुग्राममध्ये गोळीबार
गुरुग्राममध्ये प्रसिद्ध बॉलीवूड आणि हरियाणवी गायक राहुल फाजिलपुरियावर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या प्राणघातक हल्ल्यातून राहुल थोडक्यात बचावला असून गुरुग्रामजवळील बादशाहपूर एसपीआरमध्ये हा हल्ला झाला आहे. राहुल प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवचा मित्र आहे. सापांच्या विषाच्या तस्करीतही त्याचं नाव आलं होतं.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गुरुग्राममधील बादशाहपूर सदर्न पेरिफेरल रोडवरून जात असताना मागून काही हल्लेखोर त्याचा पाठलाग करत होते. टाटा पंच कारमधून आलेल्या या हल्लेखोरांनी राहुलच्या गाडीवर गोळीबार सुरू केला. हल्ला झाल्याचं समजताच राहुलने कारचं स्पीड वाढवलं. त्यामुळे तो थोडक्यात बचावला.
गायक राहुल फाजिलपुरियाने हल्ल्यानंतर याची माहिती पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिस सध्या सर्व पुरावे गोळा करत असून या घटनेवेळी उपस्थित असलेल्या इतर लोकांची चौकशी केली जात आहे. एका गायकावर हल्ला होऊ शकतो अशी माहीत काही दिवसांपूर्वी एसटीएफला माहिती मिळाल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
राहुल फाजिलपुरियाचे मूळ नाव राहुल यादव असून तो गुरुग्राममधील फाजिलपुरिया गावचा रहिवासी आहे. राहुल हा हरियाणवी रॅपर आणि गायक आहे आणि त्याने अनेक प्रसिद्ध बॉलिवूड गाणी देखील गायली आहेत. २०२३ मध्ये एल्विश यादववर सापाच्या विषाचा वापर केल्याचा आरोप झाला तेव्हा राहुल फाजिलपुरियाचंही नाव समोर आलं होतं. राहुलवर ईडीने कारवाई करत त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही राहुल प्रकाशझोतात आला होता. त्याला अजय सिंह चौटाला यांचा पक्ष जेजेपीकडून गुरुग्राममधून तिकीट देण्यात आलं होतं.
राहुल एका व्यावसायिक कुटुंबातून असून तो रॅपरही आहे. हरियाणवी गायक म्हणून त्याची मोठी ओळख आहे. याशिवाय हिंदी चित्रपटांमध्येही त्याने गाणी गायली आहेत. ‘कपूर अँड सन्स‘ चित्रपटातील ‘लार्की ब्युटीफुल‘ या गाण्याने त्यांना बॉलिवूडमध्ये खूप ओळख मिळाली. याशिवाय त्यांनी ‘लाला लोरी‘, ‘बिल्ली बिल्ली‘, ‘३२ बोर’, ‘जिमी चू’, ‘मिलियन डॉलर’, ‘टू मेनी गर्ल‘ आणि ‘हरियाणा रोडवेज‘ यासह अनेक प्रसिद्ध गाणी गायली आहेत. एल्विश यादवसोबत तो ३२ बोर या गाण्यात झळकला होता.