गडहिंग्लजमध्ये मटका अड्ड्यावर मोठी कारवाई; १२ जणांना अटक, चार लाखांचा मुद्देमाल जप्त
Kolhapur Crime News: शहरातील भडगाव रोडवरील साई उद्यानाजवळील एका घरात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर गडहिंग्लज पोलिसांनी मोठी कारवाई करत १२ जणांना अटक केली आहे. यामध्ये अड्डा चालवणारा मटका बुकी शंकर माळी याच्यासह चार महिला कामगारांचाही समावेश आहे. पोलिसांनी या छाप्यात सुमारे चार लाख चार हजार ११३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर करण्यात आली. बेळगुद्री याच्या जुन्या घरात मटका अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रमेश मोरे, उपनिरीक्षक हणमंत नाईक आणि पल्लवी पवार यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार करण्यात आले. गुरुवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास पथकाने सुरुवातीला परिसराची पाहणी करून मटक्याची खात्री केली. त्यानंतर अचूक माहितीच्या आधारे शंकर माळीच्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत तीन प्रिंटर, लॅपटॉप, मोबाईल फोन, की-बोर्ड, कॅल्क्युलेटर, मोटारसायकल, रोकड व अन्य साहित्य पोलिसांनी हस्तगत केले.
पोलिस तपासात काही महत्त्वाचे धागेदोर पोलिसांच्या हाती लागले आहेत. शंकर माळी याने गडहिंग्लजसह परिसरातील ग्रामीण भागात पंटर व एजंटांचं मोठं जाळं उभं केलं होतं. हे एजंट ग्राहकांकडून ऑनलाइन मटका खेळवून संबंधित रक्कमेचा हिशोब मोबाईलवरून देत असत. या साठी अनेक तरुण व तरुणी काम करत होते. विशेष म्हणजे यामध्ये चार महिला कामगारांचाही समावेश असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या महिलांमध्ये दोन सख्ख्या बहिणी असून त्या मूळच्या कर्नाटकातील नांगनूर (ता. हुक्केरी) येथील आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणींना लॅपटॉपवर काम करण्यासाठी रोजगार देण्यात आला होता. अड्ड्यावरून महिलांच्या सहभागामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या कारवाईमध्ये प्रियंका इंगवले, धनश्री सावंत, दादू खोत, रामदास किल्लेदार आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
Maharashtra Rain: कोसळधार थांबणार! राज्यात पाऊस ‘इतके’ दिवस ब्रेक घेणार; कसे असणार वातावरण?
या प्रकरणी, शंकर माळी (मुख्य मटका बुकी), प्रभू रामचंद्र नाईक (२४), विनायक विलास नाईक (२५), अनुराग अनिल कांबळे (२३, सर्व रा. दुंडगे), समीर गुलाब मुल्ला (४४, रा. इंचनाळ), प्रमोद बाळाप्पा देवत्रावर (३५, रा. निलजी), परशराम शंकर नाईक (३४), माधव मोकाशी (२५), मयूरी माधव मोकाशी (२०), स्वप्नाली राजू सुतार (२२, रा. गडहिंग्लज), अश्विनी रूपेश सुतार (३२), दयानंद साताप्पा बेळगुद्री (रा. साई गार्डन शेजारी, गडहिंग्लज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या सर्वांविरोधात गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अशा अवैध जुगार अड्ड्यांविरोधात पोलीस प्रशासनाची ही कारवाई ही चक्रवाढ स्वरूपात सुरू राहील, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.