मराठी चित्रपटसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार (Gandhar Gaurav Award) जाहीर करण्यात आला आहे. बालदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले (Vijay Gokhale) यांनी मंगळवारी दिली. पिळगावकर हे कला क्षेत्रातील सचिन तेंडुलकर असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. कलेच्या उद्यानात मुक्त विहार करणारे कलानंदी व्यक्तिमत्त्व म्हणजे पिळगावकर. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांच्यात कलेचा आनंद घेण्याची वृत्ती आहे.
[read_also content=”अनुराधा पौडवालांनी तब्बल १८ वर्षांनंतर गायलं मराठी गाणं https://www.navarashtra.com/movies/anuradha-paudwal-sang-song-for-kulswamini-movie-nrsr-337580.html”]
गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचं हे सातवं वर्ष आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे यांना आतापर्यंत गंधार गौरव सोहळ्याने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पिळगावकर यांना देण्यात येत आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पिळगावकर यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.