
फोटो सौजन्य - Social Media
गोवा येथे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “फिल्म बाजार” हा विभाग विशेष चर्चेचा असतो. या विभागात विविध देशांतील निवडक चित्रपटांना स्थान मिळते, जे जागतिक स्तरावर चित्रपट उद्योगातील खरेदीदार, वितरक आणि निर्मात्यांपर्यंत पोहोचण्याची संधी देतात. या विभागासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत दरवर्षी मराठी चित्रपटांची निवड केली जाते. यंदा “फिल्म बाजार – 2025” करिता मराठी चित्रपट ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ही माहिती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी जाहीर केली.
‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हा चित्रपट कीमाया प्रॉडक्शनच्या महेश कुमार जायसवाल आणि किर्ती जायसवाल यांनी निर्मित केला आहे, तर दिग्दर्शन संकेत माने यांनी केले आहे. या चित्रपटात ग्रामीण जीवनावर आधारित भावनिक आणि हृदयस्पर्शी गोष्ट मांडण्यात आली आहे. कथा एका लहान मुलीभोवती फिरते, जिने आपल्या आईकडून ऐकले की तिचे वडील “देवाघरी गेले” आहेत. हे ऐकल्यानंतर ती “देवाचं घर” म्हणजे काय आणि ते कुठे आहे, याचा शोध घेण्याच्या प्रवासाला निघते. या प्रवासात मुलीच्या निरागस प्रश्नांमागे दडलेली दुःखद वास्तवता आणि आईचा संघर्ष दिसून येतो. तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीचं पेन्शन मिळवण्यासाठी प्रशासनाशी झुंज देते, ही गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भिडते. चित्रपटाच्या ट्रेलरमधूनच या कथानकातील भावनिकता आणि समाजातील वास्तवाचे दर्शन घडते.
संकेत माने यांनी या गंभीर विषयाची मांडणी हलक्याफुलक्या आणि रंजक शैलीत केली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना विचार करायला लावतानाच हसू आणि अश्रू दोन्ही अनुभवायला मिळतात. चित्रपट ग्रामीण भागातील संस्कार, मातृत्वाची ताकद आणि मुलांच्या निरागसतेचा संगम दाखवतो.
गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ सातत्याने मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मराठी सिनेमाचा दर्जा आणि दर्जेदार कथा जगभर पोहोचाव्यात, यासाठी या महामंडळाने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, फिल्म बाजार, आणि गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांसारख्या प्रतिष्ठित मंचांवर सहभाग नोंदवला आहे. ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ची निवड ही केवळ एका चित्रपटाची नाही, तर मराठी सिनेमाच्या जागतिक प्रवासातील आणखी एक महत्त्वाची पायरी आहे. या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवे दरवाजे उघडण्याची संधी मिळणार आहे.