छोट्या मुन्नीची मोठी स्वप्नं, हर्षाली मल्होत्राच्या 'त्या' ७ गोष्टी ज्या तिला बनवतात खास
सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाची अजूनही अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होते. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा सिक्वेल येणार अशी सोशल मीडियावर चर्चा देखील सुरु होती. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाचं नाव जरी काढलं तरी आपल्या नजरेसमोर चेहरा येतो तो मुन्नीचा… चित्रपटामध्ये मुन्नीचं पात्र अभिनेत्री हर्षाली मल्होत्राने साकारलं आहे. मुन्नीच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या हर्षालीचा आज वाढदिवस आहे. आज हर्षाली तिचा १७ वा वाढदिवस सेलिब्रेट करत असून तिने फार कमी वयात यशाचं शिखर गाठलं आहे.
३ जून २००८ रोजी जन्मलेल्या हर्षालीने फार कमी वयातच बॉलिवूडमध्ये काम केले आहे. तिने ‘कुबूल है’, ‘लौट आओ तृषा’, ‘सावधान इंडिया’, ‘प्रेम रतन धन पायो’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. फार कमी वयातच हर्षालीला फेम मिळाली आहे. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात फक्त सलमानचीच नाही तर मुन्नीची भूमिका साकारणाऱ्या हर्षाली मल्होत्रीचीदेखील खूप प्रशंसा झाली होती. या चित्रपटात मुन्नीच्या निरागसतेनं रसिकांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला होता. या चित्रपटाचे चित्रीकरण झाले त्यावेळी हर्षाली अवघी सात वर्षांची होती.
हर्षाली सलमानची खूप मोठी फॅन आहे. तिला सलमानसोबत काम करण्याची इच्छा देखील होती. आणि तिला कबीर खान दिग्दर्शित ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातून ही संधी मिळाली. सलमान हर्षालीवर भरभरून प्रेम करतो. जेव्हा केव्हा त्याच्या बिझी शेड्युल्डमधून त्याला केव्हा वेळ मिळतो, त्यावेळी तो हर्षालीची आवर्जून भेट घेण्यासाठी जातोच जातो. खरंतर, सलमानला इंडस्ट्रीमध्ये बॉलिवूडचा ‘भाईजान’ किंवा ‘दबंग’ अशा नावाने हाक मारतात. पण ‘बजरंगी भाईजान’च्या शुटिंग पासून हर्षाली सलमानला काका नावानेच हाक मारायची.
हर्षालीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं की, चित्रपटाची शुटिंग सुरु असताना मी सलमानला काका म्हणून हाक मारायची. हर्षालीला अभिनयामध्येच करिअर करायचं आहे. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात हर्षालीनं मुन्नी भूमिका साकारली होती. तिच्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. सिनेमाच्या प्रीमिअरलादेखील सर्वांच्या नजरा चिमुरड्या हर्षालीवर होत्या. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात हर्षालीनं साकारलेली मुक्या मुलीची भूमिका सर्वांनाच आवडली होती. आजही तिच्या अभिनयाचं कौतुक केलं जातंय. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील मुन्नी भूमिकेसाठी कबीर खान आणि त्यांच्या टीमने हजारो मुलींमधून हर्षालीची निवड केली आहे.
‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेसाठी कबीर खान आणि त्यांच्या टीमने खूप शोधाशोध केली होती. मुन्नीच्या भूमिकेसाठी त्यांनी हजारो मुलींच्या ऑडिशन घेतल्या होत्या. हजारो मुलींमधून कबीर यांना हर्षालीच्या रुपात मुन्नी सापडली. चित्रपटाच्या प्रमोशपासून हर्षालीला लांबच ठेवलं होतं. चित्रपटाच्या शुटिंगवेळी सुद्धा चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून तिची खास काळजी घेतली जात होती. हर्षालीचा मूड चांगला ठेवण्यासाठी संपूर्ण टीम तिच्यासाठी तैनात असायची. तिच्यावर कामाचा ताण पडू नये, याचीही खास खबरदारी घेतली जायची.
‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या आधी हर्षालीने सलमानच्या एका चित्रपटात काम केलं होतं. हर्षालीची ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटासाठी निवड झाली होती. हर्षालीच्या आई काजल मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षालीला ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटासाठी फायनल केलं होतं. इतकंच नाही तर चित्रपटाच्या पोस्टरसाठीही तिनं शुटिंगमध्ये सहभाग घेतला होता. अर्थात या चित्रपटामध्ये हर्षालीची भूमिका छोटी होती.