Aambat Shoukin Marathi Movie Tambu Pirmacha Petla Gautami Patil Song Released On Social Media
मराठी चित्रपटसृष्टीत आयटम साँग्सना मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असताना, आता ‘आंबट शौकीन’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘तंबू पिरमाचा पेटला’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्यात लावणी क्विन गौतमी पाटीलच्या ठसकेबाज अंदाजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. गाण्याच्या एनर्जेटिक संगीताने व नृत्याने गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
या गाण्याला पियुष कुलकर्णी, ओंकारस्वरूप बागडे आणि अजित विसपुते यांचे दमदार स्वर लाभले आहेत. संगीतकार साई-पियुष यांच्या जोशपूर्ण बीट्समुळे गाण्याला एक हटके आणि एनर्जेटिक टोन लाभला आहे. तर गीतकार संदेश राऊत यांनी हे गाणे लिहिले आहे. तसेच राहुल ठोंबरे यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. राहुल ठोंबरेंनी गौतमी पाटीलच्या ॲटिट्यूड व एनर्जीला तडफेने सादर करण्याची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली आहे.
दिग्दर्शक निखिल वैरागर म्हणतात, “ ‘तंबू पिरमाचा पेटला’ हे गाणे शूट करताना आम्ही फार मजा केली. अर्थातच गौतमी पाटीलमुळे या गाण्याला चारचांद लागले. ती एक उत्तम नर्तिका आहे आणि तिच्यामुळे या गाण्याला अजूनच रंगत आली असे मी म्हणेन. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे व प्रत्येकाच्या पार्टी प्लेलिस्टमध्ये हे गाणे असेल हे नक्की.”
निर्माते प्रफुल्ल काकाणी म्हणतात, “ ‘आंबट शौकीन’च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली याचा खूप आनंद होतो. आता या चित्रपटातील जबरदस्त गाणे ‘तंबू पिरमाचा पेटला’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यातील कलाकार, संगीतकार, गायक, नृत्य दिग्दर्शक व चित्रपटाच्या संपूर्ण टीमने उत्तम कामगिरी पार पाडली आहे. प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच भावेल याची मला खात्री आहे.”
हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ या चित्रपटात पूजा सावंत, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड, प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत आणि राहुल मगदूम यांसारखे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार पाहायला मिळतील. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन व कथा निखिल वैरागर यांची असून प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा व निलेश राठी निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांचे आहेत. येत्या १३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.