jasleen royal in indias got talent
‘इंडियाज गॉट टॅलेंट’(India’s Got Talent) या टॅलेंट रिॲलिटी शो ने सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या (Sony Entertainment Television) प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या शनिवारची संध्याकाळ खास असणार आहे. कारण ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ च्या शनिवारच्या भागातील आमंत्रित पाहुणे आहेत, आकर्षक रॅपर रफ्तार आणि लोकप्रिय गायिका जसलीन रॉयल (Jasleen Royal). ‘हीरीये’ या गाण्याच्या प्रमोशनसाठी ते येणार आहेत. शनिवारी रात्री 9:30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर हा भाग पाहता येईल.
यावेळी सर्वच्या सर्व 14 स्पर्धक आपल्या दमदार परफॉर्मन्सने प्रेक्षक आणि परीक्षकांचे मनोरंजन करताना दिसतील. या भागात जसलीन आपलं मत मांडेल. एक वेळ अशी होती, जेव्हा जसलीन या शोमध्ये स्पर्धक म्हणून आली होती. आता ती पाहुणी म्हणून दिसणार आहे.
ती म्हणाली, “इंडियाज गॉट टॅलेंटच्या याच मंचापासून माझा प्रवास सुरू झाला होता आणि आज माझ्या एका स्वतंत्र गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी मी इकडे आले आहे, हे अगदी स्वप्नासारखं वाटतंय. या शोमध्ये स्पर्धक म्हणून येऊन गेल्यानंतर मला खूप प्रेम आणि आपुलकी मिळाली. मी कधीच अशी कल्पना केली नव्हती की, इतक्या वर्षांनंतर मी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये पाहुणी म्हणून येईन. मी जेव्हा या मंचावर आले आणि परीक्षकांना पाहिले तेव्हा जुन्या आठवणी उफाळून आल्या. महिला बॅन्डला कौल देण्यासाठी जेव्हा मी विनंती केली, तेव्हा मला वाटले की मी त्या जागी आधी आले आहे. जीवनाचे चक्र पूर्ण झाल्यासारखे मला वाटते आहे.”
किरण खेरबद्दल ती म्हणाली, “किरण खेर मॅम आणि माझ्यात त्या अनुच्चारित भावनांची देवाणघेवाण झाली. जेव्हा त्या म्हणाल्या की, ‘तू चांगले काम करत आहेस’ तेव्हा मला खूप छान वाटलं. पूर्वी त्यांनी मला ‘वन गर्ल आर्मी’ असं नाव दिले होते. आजही जेव्हा मला या नावाबद्दल विचारण्यात येते, तेव्हा मी अभिमानाने सांगते की, किरण मॅमनी मला हे नाव दिले आहे. मी हे ठामपणे सांगू शकते की, इंडियाज गॉट टॅलेंट हा माझ्या जीवनातला टर्निंग पॉइंट होता.”