"पण तुम्ही हिंदूंना का शिवीगाळ करताय?", पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांच्यावर गायक जावेद अख्तर संतापले
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती झाली होती. दोन्हीही देशातील ही तणावाची परिस्थिती १० मे रोजी शस्त्रविरामाची घोषणा करत नमली. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. शिवाय, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवस आधी जनरल मुनीर यांनी केलेल्या टिप्पण्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ मधून माघार घेतली? इतके टोकाचे पाऊल उचलण्यामागील खरं कारण काय
असीम मुनीर म्हणाले की, “आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की, आपण हिंदूंपेक्षा जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत वेगळे आहोत. आपला धर्म वेगळा आहे, त्याशिवाय आपले रितीरिवाजही वेगळे आहेत, आपल्या परंपराही वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत आणि आपल्या महत्त्वाकांक्षाही वेगळ्या आहेत”. असीम मुनीर यांनी केलेले हे वक्तव्य असंवेदनशील असल्याचे जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. नुकतंच ज्येष्ठ वकिल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांना गायक आणि संगीतकार जावेद अख्तर यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी जनरल मुनीर यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मुलाखती दरम्यान गायक आणि संगीतकार जावेद अख्तर म्हणाले की, “भारत केव्हाही पाकिस्तानी नागरिकांना बदनाम करु इच्छित नाही. मुख्य बाब म्हणजे, कोणताही देश केव्हाच एकसंध नसतो. कोणत्याही देशातील नागरिक हे एक सारखे असू शकत नाहीत. जर कोणत्याही देशाचे सरकार वाईट असेल तर, त्याचा सर्वात पहिला परिणाम तिथल्या नागरिकांवरच होतो. आपला संघर्ष फक्त सरकार, लष्कर आणि अतिरेक्यांसोबतच असायला हवा. आपली संपूर्ण सहानुभूती त्या निष्पाप लोकांसोबत असावी, जे या सगळ्यांमुळे त्रस्त आहेत.”
पाकिस्तानचे जनरल असीम मुनीर यांच्याबद्दल जावेद अख्तर म्हणाले की, “मी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे भाषण यूट्यूबवर पाहिले. त्या मुलाखतीत तो माणूस किती असंवेदनशील माणूस वाटत होता. जर तुम्हाला वाटत असेल की, आम्ही वाईट आहोत, तर भारतीयांना शिवीगाळ करा, पण तुम्ही हिंदूंना शिवीगाळ का करीत आहात? पाकिस्तानमध्येही हिंदू लोक राहतात, हे त्यांना समजत नाही का? तुम्ही स्वतःच्या देशातील नागरिकांचा आदर करू शकत नाही का? असे कसले मनुष्य आहात तुम्ही? तुम्ही काय बोलताय? तुम्हाला काही समज आहे की नाही?”
जावेद अख्तर पुढे म्हणाले की, “त्यांच्याकडे असलेल्या क्षेपणास्त्रांपैकी एका क्षेपणास्त्राचं नाव ‘अब्दाली’ आहे. अब्दालीने तर मुसलमानांवरच हल्ला केला होता. तो तुमचा हिरो कसा? तुमच्या मातीत जन्मलेल्यांचं काय? तुम्हाला इतिहासाची काही समज आहे का? प्रश्न हा आहे की, त्यांचा इतिहास आणि भूगोल एकमेकांशी जुळत नाही. जे समुदाय ते आपले म्हणवतात, त्यांना त्यांच्याशी काहीही देणंघेणं नाही. अनेक अरब देशांनी आता पाकिस्तानच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे. ही अवस्था अशी आहे की, जणू दिल्लीच्या रस्त्यांवर एखादा मुलगा म्हणतोय की ‘मी शाहरुख खानला ओळखतो’, पण शाहरुख खानलाच माहिती नाही की हा मुलगा कोण आहे. पाकिस्तानची अवस्था अशीच आहे.” असेही त्यांनी म्हटले.