हुबेहूब इंदिरा गांधी... कंगना रणौतने माजी पंतप्रधानांच्या भूमिकेसाठी 'अशी' घेतली मेहनत; Video Viral
अभिनेत्री कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अखेर सज्ज झाला आहे. चित्रपटाचा नवा ट्रेलर नुकताच (६ जानेवारी २०२४ ला) सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. हा चित्रपट येत्या १७ जानेवारी २०२५ ला जगभरात रिलीज होणार आहे. प्रदर्शनाच्या काही दिवस आधी सोशल मीडियावर कंगना रणौतचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री कंगना रणौत कशाप्रकारे प्रोस्थेटिक मेकअपच्या साहाय्याने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतेय, हे दाखवले आहे.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी कंगना रणौतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री कशा प्रकारे प्रोस्थेटिक मेकअपच्या साहाय्याने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसते, हे दाखवले आहे. कंगनाने इंदिराजींच्या एक्सप्रेशन्सपासून ते तिच्या अभिनयापर्यंत सर्व काही उत्तमरित्या साकारले आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटासाठी कंगनाने संपूर्ण मेकओव्हर केला असून तिने प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला आहे. कंगनाचा मेकओव्हरचा व्हिडिओ अभिनेते अनुपम खेर यांनी शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा मेकओव्हर मेकअप आर्टिस्ट डेव्हिड मालिनोव्स्की यांनी केलेला असून त्यांनी कंगनाला हुबेहूब इंदिरा गांधी बनवण्यासाठी विशेष मेहनत घेतलीये.
त्यांनी केलेला लूक पाहून फक्त चित्रपटातील कलाकाराच नाही तर, अवघा चाहतावर्गही अवाक झाला आहे. अनुपम खेर यांनी कंगना रणौतचा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले की, “जबरदस्त… कंगना रणौत भारताच्या इतिहासातल्या सर्वात ताकदवान महिला इंदिरा गांधी बनल्या! ऑस्कर विजेते प्रोस्थेटिक आणि मेकअप आर्टिस्ट डीजे मालिनोव्स्की यांच्या कला कौशल्याच्या माध्यमातून झालेला हा अद्भुत बदल नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.” कंगना रणौतचा हा मोकओव्हरचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असून कंगना रणौतसह श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण आणि सतीश कौशिकसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा स्वत: कंगना रणौतनेच सांभाळली आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दस्तुर खुद्द स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका कंगना रणौतने साकारली आहे. तर, अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत श्रेयस तळपदे दिसणार आहे. तर सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेत मिलिंद सोमन दिसणार आहे. जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत अनुपम खेर दिसणार आहे. खरंतर हा चित्रपट २०२४ मध्ये रिलीज होणार होता. पण चित्रपटाबद्दलचा वाद कोर्टात गेल्याने प्रदर्शन थांबलं.. काही बदल आणि १३ सीन्सला कात्री लावल्यानंतर सेन्सॉर बोर्डानं सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदिल दिला. सुचवलेल्या सर्व बदलानेच चित्रपट १७ जानेवारी २०२५ ला जगभरात रिलीज होणार आहे.