‘आई कुठे...’ फेम अभिनेत्रीच्या पतीने शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, “लग्नसंस्काराचे अग्निदिव्य पार पाडण्यासाठी मदतीला आलेल्या...”
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आणि ‘आई कुठे काय करते’ फेम कौमुदी वालोकर हिने गेल्या काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने बॉयफ्रेंड आकाश चौकसेसोबत २६ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. दोघांनीही आपल्या सोशल मीडियावर मेहंदी, हळदी आणि संगीत यांसारख्या कार्यक्रमांचे फोटो शेअर केले होते. या कार्यक्रमातील फोटोंवर कौमुदीच्या सेलिब्रिटी मित्रांनीच नाही तर, तिच्या अनेक चाहत्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या होत्या. आता कौमुदीचा पती आकाश चौकसे याने इन्स्टाग्रामवर लग्नातील काही खास फोटो शेअर करत त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
“‘छावा’चा भाग होण्यासाठी मी स्वतःला…”, चित्रपटाबद्दल सुप्रसिद्ध कथा- पटकथाकार काय म्हणाले ?
आकाश चौकसेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना आकाश चौकसेने कॅप्शन देत लिहिलेय की, “लग्नसंस्कारांकडे मागे वळून बघताना मन कृतज्ञ भावनेने भरून गेले आहे. संस्कार जरी दोघांचा असला तरी पडद्यामागे शेकडो लोक नि:स्वार्थीपणे आणि उत्साहाने काम करत असतात; मग ते पालक असोत, नातेवाईक असोत, की मित्रपरिवार. कार्यक्रम उत्तम व्हावा यासाठी ते अतोनात प्रयत्न करतात. तेव्हाच इतका देखणा सोहळा उभा राहतो. संगीतच्या तालमीपासून घरातल्या छोट्या-मोठ्या गोष्टींची जुळवाजुळव, पाहुण्यांचे आदरातिथ्य, प्रचंड सामानाची खरेदी, ऐन वेळी येणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक आणि असंख्य इतर गोष्टींची काळजी घेत, स्वतःची आवराआवर करून वेळेचं गणित सांभाळणं हे सोपं काम नाही. त्यात अनेक लोक एकत्र येऊन विचार करणार, तेही दोन अनोळखी कुटुंबांतले, म्हणजे गडबड-गोंधळ होणारच. त्यातून मार्ग काढत हे लग्नसंस्कार नावाचे अग्निदिव्य पार पाडण्यासाठी मदतीला आलेल्या सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या सर्वांच्या प्रेमाची उतराई होऊ शकत नाही. त्या प्रेमाच्या ऋणातच राहणे उचित राहील. आपलेच- आकाश व कौमुदी”, असे लिहीत कृतज्ञता व्यक्त केली आहे. दरम्यान, आकाशने ही लग्नाची स्पेशल पोस्ट त्याच्या पत्नीला म्हणजेच, कौमुदीलाही टॅग केले आहे.
दरम्यान, अभिनेत्री कौमुदी वालोकर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तिने स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत तिने साकारलेली आरोहीची भूमिका चाहत्यांच्या विशेष पसंदीस पडली होती. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेनंतर कौमुदीकडे इतर कोणताही प्रोजेक्ट हातात नाही. आता कौमुदी कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ते पाहावे लागेल.