(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मनोरंजनसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच गुजरातमध्ये मोठ्या थाटात पार पडला. शाहरुख खान, चित्रपट निर्माते करण जोहर आणि मनीष पॉल यांच्यासह या समारंभाचे सूत्रसंचालन केले.तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळाली.
या ७० व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात, या वर्षी “लापता लेडीज” आणि “किल” यांनी फिल्मफेअर पुरस्कारांवर वर्चस्व गाजवले आहे. दोन्ही चित्रपटांनी अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले आहेत. विशेष म्हणजे, याच चित्रपटातील ‘मंजू माई’ या भूमिकेसाठी मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
BO Collection: ‘कांतारा चॅप्टर १’ ची तुफान कमाई, लवकरच ४०० कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील
हे छाया कदम यांचं पहिलंच फिल्मफेअर, त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पुरस्कार स्वीकारताना त्या मंचावर भावूक झाल्या आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारताना छाया कदम म्हणाल्या,“प्रत्येकवेळी असं वाटायचं की आता मला पुरस्कार मिळेलच. सगळेजण कौतुक करायचे पण पुरस्कार काही केल्या मिळत नव्हता.यावेळी विचार करून ठेवला होता. अवॉर्ड मिळो किंवा न मिळो… मस्त तयार होऊन आपण या सोहळ्याला जायचं! यावेळी त्यांनी दिग्दर्शिका किरण राव यांचे आभार मानताना म्हणाल्या:“थँक्यू सो मच! किरण आय लव्ह यू… तू माझ्यावर इतका विश्वास ठेवलास. एका मराठी मुलीला तू युपीमधली मंजू माई बनवलंस… मला स्वतःला खात्री नव्हती की, मी खरंच ही भूमिका करेन की नाही. पण तू नेहमी मला विश्वास दिलास. मी आज जास्त काही बोलणार नाही. हा पुरस्कार त्या सगळ्यांसाठी आहे, जे लोक इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षं काम करत आहेत आणि नेहमी विचार करतात… ‘कधी होणार?’ ‘कधी पुरस्कार मिळेल?’ ‘मेरा टाइम कब आएगा?’ त्या सगळ्यांसाठी हा पुरस्कार आहे.”
पुरस्कार स्वीकारताना त्या म्हणाल्या, “यानिमित्ताने माझं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं. मी शाहरुख खानला भेटले! असंही त्यांनी सर्वांना सांगितलं.या दरम्यान बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खान यांनीही अत्यंत आपुलकीने प्रतिसाद दिला. मंचावरच त्यांनी छाया कदम यांना मिठी मारली, “गॉड ब्लेस यू” म्हणत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि अत्यंत आदराने स्वतः मंचावरून त्यांना खाली सोडवून आणलं. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या व्हायरल व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.