"मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन..." वैशाली सामंतने सरकारकडे मागितला मदतीचा हात
‘ऐका दाजिबा’, ‘कोंबडी मिळाली’ आणि ‘गुलाबाची कळी’ अशा वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून गायिका वैशाली सामंत प्रसिद्धी झोतात आलेली आहे. आपल्या सर्वांची लाडकी आणि सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत हिने आपल्या दमदार आवाजाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. हिंदी, मराठीसह इतर भाषांमध्ये वैशाली सामंत सहजतेने वावरलेली आहे. वैशाली सामंत ही फक्त गायिकाच नव्हे तर संगीतकार, गीतकार असा तिचा प्रवास उंचावत गेला आहे. कायमच आपल्या गाण्यांमुळे चर्चेत राहणारी वैशाली सामंत सध्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
गायिका सावनी रविंद्रच्या म्युझिक पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत वैशाली सामंतने मराठी कलाकारांना ना PF मिळतो ना पेंशन मिळते. सरकारने लक्ष द्यायला हवं अशी खंत तिने बोलून दाखवली आहे. गायिका सावनी रविंद्र आपल्या म्युझिक पॉडकास्टमध्ये संगीत सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना बोलते केले आहे. याला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. सावनीने आपल्या मराठी संगीत सृष्टीत काय बदल हवे आहेत असं विचारल्यावर वैशाली सामंत म्हणाल्या की, सरकराने आपल्या महाराष्ट्रात असलेल्या कलाकारांना घेऊन अनेक उपक्रम राबवले पाहिजेत.
वैशाली सामंतला विचारल्यावर ती म्हणाली की, “आपल्या कलाकारांना PF मिळतो का तर नाही, पेंशन मिळते का तर नाही. मला असं वाटत की, एका कलाकाराला यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी त्यांचे बेनिफिट्स योग्य वेळेत त्याला मिळाले तर तो नक्कीच गगन भरारी घेईल. आम्ही कलाकार जीव ओतून काम करायला तयार आहोत. आम्हाला एक संधी द्या आणि ही संधी फक्त सरकारच देऊ शकते. थोडसं सरकारने मराठी सिनेसृष्टीत लक्ष घालाव. सरकारने प्रत्येक कलाकाराला दरवर्षी एक तरी प्रोजेक्ट द्याला हवे त्यांचा संपूर्ण आढावा देखिल घ्यावा. आपल्याला सरकारच्या पाठबळाची गरज आहे. आता आपलं Competition हे मराठीत मर्यादित न राहता जगातल्या प्रत्येक कलाकारांशी आहे. आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे याचा आनंद आहे. कलाकार ही एक स्वतंत्र कंपनी आहे आणि हे सरकारला कळायला हवं. आता समुद्रमंथनाची वेळ आली आहे.” असं म्हणत वैशाली सामंत यांनी सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. आता सरकार याकडे कितपत लक्ष घालेल हे पाहणं गरजेच आहे.