
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
काही दिवसांपूर्वीच ‘लग्नाचा शॉट’ चित्रपटाचा धमाल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता चित्रपटातील टायटल साँग ‘लग्नाचा शॉट’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अभि आणि कृतिकाच्या केळवणानंतर त्यांच्या हळदीचा जल्लोष या गाण्यात रंगताना दिसतो आहे. सगळीकडे नाच, गाणी, हळदीची धमाल, मज्जा सुरू असतानाच नवरदेव अभि मात्र खुश नसल्याचे जाणवते आहे. ‘डोक्याला ताप झाला लग्नाचा शॉट!’ असे म्हणत अभिचा गोंधळ आणि लग्नाची भीती या गाण्यात मजेशीर पद्धतीने मांडण्यात आली आहे.
पहिली केस, मोठी जबाबदारी, उज्ज्वल निकम यांच्या मदतीने अॅड ऊर्जा करणार पहिल्या केसची तयारी
अभिला लग्नाची इच्छा नसली तरी हलक्याफुलक्या विनोदातून आणि धमाल तालावर तयार झालेले हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच ठेका धरायला भाग पाडणारे आहे. या गाण्याला नकाश अझीझ यांचा कमाल आवाज लाभला असून प्रविण कोळी आणि योगिता कोळी यांचे जबरदस्त संगीत आणि शब्द या गाण्याला लाभले आहेत. तर या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सचिन कांबळे यांनी केले आहे.
या चित्रपटाबद्दल आणि गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक अक्षय गोरे म्हणाले, “लग्न हा आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो, परंतु प्रत्येकजण त्यासाठी मनाने तयार असेलच असे नाही. अभिच्या मनात चाललेला गोंधळ आणि बाहेर सुरू असलेला हळदीचा जल्लोष हा विरोधाभास ‘लग्नाचा शॉट’ गाण्यात आम्ही मजेशीर पद्धतीने दाखवला आहे. प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच आवडेल आणि प्रत्येक हळदीत हे गाणे आवर्जून वाजेल, याची मला खात्री आहे.
महापर्व फिल्म्स निर्मित आणि जिजा फिल्म कंपनी यांच्या सहयोगाने साकारलेल्या ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले आहे. गीत-संगीताची धुरा प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली असून अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात प्रियदर्शिनी इंदलकर, अभिजीत आमकार, प्रभाकर मोरे, अभिजीत चव्हाण, राजन ताम्हाणे, लीना पंडित, संजय कुलकर्णी, विजय पवार, मनोहर जाधव, संजीवनी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.