(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झालेली अंकिता वालावलकर या रिॲलिटी शोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. अंकिता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून ती सामाजिक, राजकीय विषयांवर नेहमीच आपले मत मांडताना दिसत असते. तसेच सोशल मीडियावर ती ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली आणि आता तिला संपूर्ण महाराष्ट्र या नावाने ओळखतो. अशातच आता अंकिताने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नांदगाव येथील प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आले आहे. मात्र, या प्रवेशद्वारासमोर सर्वत्र कचरा पडलेला दिसून येत आहे. यावर अंकिताने आता संताप व्यक्त केला आहे. आणि सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून लोकांना संदेश दिला आहे.
मरण्याआधी चाहत्याने ७२ कोटींची संपत्ती केली संजय दत्तच्या नावावर, अभिनेत्याने पैशांचे केले तरी काय?
व्हिडिओमध्ये अंकिता म्हणताना दिसत आहे की ‘सोशल मीडियावर जर कोणी म्हटलं की, शिवाजी पार्कला हा इव्हेंट होतोय तर आपण त्यांना रागात म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणा, कारण, आपल्या प्रत्येकाच्या मनात महाराजांबद्दल एक अभिमान आहे. पण, खरोखर आपण ते जपतोय का? हे आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार…नांदगाव, इथे असा कचरा केलाय. मला एक सांगा आज महाराज असते तर, ते आज या प्रवेशद्वारातून येऊ शकले असते का? आपण त्यांना येऊ दिलं असतं का? ज्याठिकाणी आपण इतिहासाचं नाव लावतोय जर त्याठिकाणचं सौंदर्य आपल्याला राखता येत नसेल तर, ते नाव लावताय कशाला? आता जे मला सांगतील की, हे तू जाऊन साफ कर त्यांना मला एकच सांगायचंय! कचरा न करणं, कचरा होऊ न देणं आणि ज्याठिकाणी महाराजांचं नाव लागतंय त्या जागेचं पावित्र्य जपणं हीच खरी शिवप्रेमींची ओळख आहे. जर, हे जमत नसेल तर त्याठिकाणी महाराजांचं नाव वापरूच नका. गेले कित्येक दिवस मी हे रोज बघतेय. पण तो कचरा कोणच साफ करत नाहीये.’ असे म्हणून तिने व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गेटवर नाव महाराजांचं… पण समोरचं दृश्य लाजिरवाणं! एक लक्षात घ्या इतिहास फक्त पुस्तकांत नसतो, तो आपल्या आजुबाजूच्या जागांमध्येही असतो. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर आपल्या अस्मितेचं प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख जिथे होतो, तिथे आपोआपच अभिमान आणि आदराची भावना जागी होते.’
पुढे म्हणाली, ‘परंतु आज अनेक ठिकाणी “शिवाजी महाराज चौक”, “शिवाजी महाराज गेट” अशा ऐतिहासिक नावांखाली असलेल्या जागांभोवती घाण, कचरा, निष्काळजीपणा आणि बेफिकिरीचं दु:खद चित्र दिसून येतं. किती विसंगती आहे ही– एकीकडे महाराजांचा जयघोष, दुसरीकडे त्यांच्या नावाजवळच साचलेला कचरा! हे फक्त त्या जागेचं नाही, तर आपल्या मानसिकतेचंही द्योतक आहे. शिवरायांच्या विचारांनी चालणं म्हणजे फक्त गड किल्ले बघणं नव्हे, तर स्वच्छता, शिस्त, आणि सजग नागरिकत्व हे त्यांच्या आदर्शाचं खरे अनुकरण आहे. मग आपण रोज ज्या गेटखालून पाटीला नमस्कार करतो, तिथं जर आपणच प्लास्टिक, घाण, थुंकी आणि कचऱ्याचा ढीग ठेवत असू – तर तो नमस्कार केवळ दिखावा आहे का?’
तसेच, ‘आज गरज आहे ती फक्त “शिवप्रेम” बोलण्यात नसून, ते कृतीत दाखवण्याची’ असे म्हणून अंकिताने आपला संताप व्यक्त केला आहे. आणि प्रेम आणि आपुलकीच्या भावनेने लोकांना संदेश दिला आहे. अंकिताने पुढे ही घटना कधी झाली याची तारीख देखील शेअर केली आहे. २७/०७/२०२५ ही तारीख लिहून तिने ही पोस्ट शेअर केली आहे. नक्कीच लोक अंकिताच्या बोलण्याचा गंभीर विचार करतील अशी आशा आहे. तसेच आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.