
बाई तुझा आशिर्वाद या नव्या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. मालिकेतील मुख्य कलाकार कोण आहे हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की, लग्न करुन आलेली नववधू घरात गृहप्रवेश करते तेव्हा ते घर अस्वच्छ असतं. लग्न होऊन नववधूच्या रुपात येणाऱ्या तिला तिचा नवरा म्हणतो की, आमचं चार भावंडाचं घर म्हणजे फक्त चार भिती नाही तर मंदिर आहे. आता हे घर देखील तुझं आहे. आपल्या या घरात तुझं स्वागत आहे. तेवढ्यात ही नववधू घराचा दरवाजा खोलते आणि समोर अस्ताव्यस्त पडलेली पांघरुणं, खरकटलेली भांडी असं सगळं अस्वच्छ घर पाहून ती पहिले घर साफ करण्यासाठी पदर खोचते.
‘आम्ही सातपुते’ सिनेमाची आठवण
मालिकेचा हा प्रोमो पाहून आम्ही सातपुते सिनेमाची आठवण झाली असं नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. आम्ही सातपुते सिनेमाची कथा वाटते असं अनेकांनी सांगितलं. काही युजर्सने असं देखील म्हटलं की, प्रोमोच्या सुरुवातीला लागलेलं बॅकग्राऊंड म्युझिक हे फुलाला सुगंध मातीचामधील आहे तर प्रोमोतील नायकाचा आवाज हा साधी माणसंमधील सत्याचा आहे. त्यामुळे या नव्या मालिकेत हर्षद अटकरी तर नाही ना किंवा मालिकेत आवाज हा साधी माणसंमधील सत्याचा वाटतोय असे अनेक संभ्रम प्रेक्षकांमध्ये आहेत. बाईशिवाय घराला घरपण नाही. तिच्या वावरण्याने लक्ष्मी घरात नांदते. याच घराच्या लक्ष्मीची गोष्ट आता वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न वाहिनीकडून होत आहे.
या मालिकेत देखील होऊन गेलेल्या जुन्या मालिकेतील कलाकार पुन्हा नव्या भुमिकेत पाहायला मिळणार आहेत का हे येत्या काही दिवसांतच कळणार आहे. गेल्या दोन महिन्यात आता येणारी ही चौथी नवी मालिका आहे. त्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल ही मालिका आणि नवे कलाकार प्रेक्षकांची मनं जिंकणार का हे पाहणं विशेष ठरणार आहे.