(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आजवर बऱ्याच प्रेमकथांनी रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळेच निर्माते-दिग्दर्शकही वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील प्रेमकथा रसिकांसमोर सादर करण्यास उत्सुक असतात. याचदरम्यान आता ‘कढीपत्ता’ हा आगामी मराठी चित्रपट नवी प्रेमकथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’ अशी या चित्रपटाच्या शीर्षकाला देण्यात आलेली टॅगलाईनने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नव्या दमाचे निर्माता आणि दिग्दर्शकाची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ७ नोव्हेंबर रोजी ‘कढीपत्ता’ हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
युवान प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘कढीपत्ता’ चित्रपटाची निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी केली आहे. या चित्रपटाचे कथा लेखन आणि दिग्दर्शन विश्वा यांनी केले आहे. निर्माते स्वप्नील युवराज मराठे आणि दिग्दर्शक विश्वा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. पहिल्याच प्रयत्नांत दोघांनीही एक संगीतप्रधान प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. मोशन पोस्टरवर निसर्गरम्य वातावरणात बसलेली नायक-नायिकेची जोडी पाहायला मिळत आहे.
‘कढीपत्ता’ या चित्रपटात अभिनेता भूषण पाटील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच, चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अभिनेत्री पाठमोरी बदलेली आहे. पाठमोरी बसलेल्या अभिनेत्रीचा संवाद खूप मार्मिक आहेत. ती म्हणते की, “ए तुला आठवतं बाबांनी आपल्याला कढीपत्त्याचं महत्त्व सांगितलं होतं. आपण त्याचे गुणधर्म विसरतो आणि फक्त त्याचा उपयोग लक्षात ठेवतो. उपयोग हा क्षणभरासाठी असतो, पण मी तुला एक सांगू का, त्याचा गुणधर्म हा कायमचा राहतो. हाच उपयोग आणि गुणधर्म यातील फरक नक्की काय असतो तेच आपल्याला कळत नाही.” या चित्रपटात भूषणची अभिनेत्री कोण, हे रहस्य सध्या तरी गुलदस्त्यात आहे. त्यामळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. लवकरच ‘कढीपत्ता’मधील नायिकेचा चेहरा रिव्हील केला जाणार आहे.
या चित्रपटाबाबत दिग्दर्शक विश्वा यांनी आपले मत मांडले आहे. त्या म्हणाल्या, ‘या चित्रपटात खऱ्या अर्थाने अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आजच्या काळातील तरुणाई, त्यांची मते, विचार, भावना, नातेसंबंध, जबाबदाऱ्या आणि एकूणच त्यांच्या भावविश्वाची सुरेख गोष्ट या चित्रपटात आहे. प्रेमकथेला सुरेल गीत-संगीताची जोड देत ‘कढीपत्ता’च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्ये असणारा चित्रपट प्रेक्षकांसाठी सादर केला आहे. आजवर अनेक प्रेमकथा आल्या असल्या तरी यातील विषय आणि पैलू कधीही समोर आलेले नाहीत. चित्रपटाला देण्यात आलेली ट्रीटमेंटही खूप वेगळी असल्याने प्रेक्षकांना एक वेगळ्या वाटेवरील चित्रपट पाहिल्याची अनुभूती ‘कढीपत्ता’ नक्कीच देईल.’ असे विश्वा म्हणाल्या आहेत.
महेश बाबू प्रस्तुत ‘राव बहादूर’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता
या चित्रपटात अक्षय टांकसाळे, संजय मोने, शुभांगी गोखले, गार्गी फुले, आनंदा कारेकर, गौरी सुखटणकर यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. तसेच, आनंद इंगळे आणि चेतना भट पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसणार आहे. या चित्रपटाचे छायांकन अनिकेत खंडागळे यांनी केले असून वितरणाची जबाबदारी सिनेपोलीस सांभाळणार आहे. संयुक्ता सुभाष या चित्रपटाच्या प्रोजेक्ट हेड, तर विशाल चव्हाण कार्यकारी निर्माते आहेत. ‘कढीपत्ता’ चित्रपटाचे गीतकार मंदार चोळकर, मुकुंद भालेराव, विनू सांगवान यांनी लिहिले आहे. तर, गीते संगीतकार पद्मनाभ गायकवाड आणि आशिष खांडल यांनी केले आहे. रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, अनन्या वाडकर, साज भट्ट, प्रियांशी श्रीवास्तवा यांच्या आवाजात या चित्रपटामधील गाणी संगीतबद्ध केली आहेत.