(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी जनमानसासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची ‘अभंग गाथा’ याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला, तर जगद्गुरूंच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला आहे. तुकोबांच्या या अभंग गाथेने तत्कालीन समाजव्यवस्थेचा विरोध झेलून आपल्या जीवनाच पाय भक्कम केला आहे. आजही मराठी लोकांच्या वापरात या गाथेतल्या अभंगाची चरणे, म्हणी, वाक्प्रचार या स्वरूपात आपल्याला ऐकू येतात. रोजच्या जगण्यात आज ३५० वर्षांनंतरही संत तुकाराम आपल्या या अजरामर रचनांमधून वास्तव्य करत आहेत असे भासवतात.
प्राजक्ता शंभूराजची भन्नाट लव्हस्टोरी! ‘अपघात ते लग्न’ अनोखा, सुंदर अन् फिल्मी प्रवास
जगद्गुरूंचे हे तत्वज्ञान नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘अभंग तुकाराम’ हा नवा कोरा चित्रपट ७ नोव्हेंबरला घेऊन येत आहेत. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. एकदा तत्कालीन धर्ममार्तंडानी संत तुकारामांची अभंग गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्याचा आदेश दिला होता. तेव्हा संत तुकोबांनी हे आव्हान स्वीकारले आणि गाथा नदीत बुडवल्या. त्यांनतर या गाथा कशा तरल्या ? त्यातून काय संदेश दिला गेला ? आणि या सगळ्यात संपूर्ण समाजाने संत तुकारामांवरील भक्तीपोटी आणि प्रेमापोटी काय काय त्याग केला ? याचे थरारक आणि भावस्पर्शी असे चित्रण ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटातून प्रेक्षकांना दिसणार आहे.
चित्रपटाचे मोशन टिझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. त्यात पाण्याच्या तरंगांबरोबर वर जाणारे अभंगांचे कागद दिसत आहेत. त्याबरोबर आपल्याला पाठमोरे संत तुकाराम देखील दिसत आहेत. जे आकाशाकडे हात पसरून साद घालत आहेत. त्यांच्या समोरून उगवणारा सूर्य हा आशेचे किरण पसरवीत आहे. त्याचवेळी “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” हि तुकोबारायांची अमर रचना मधुर आवाजात ऐकू येत आहे. त्या तालावर ‘अभंग तुकाराम’ हे चित्रपटाचे नाव भव्य स्वरूपात आकाशात आकाराला येऊन संत तुकारामांचे आणि त्यांच्या रचनांचे अभंगत्व अधोरेखित करताना दिसत आहे.
अत्यंत सुंदर चित्रपटाचे हे शीर्षक आणि कथा पाहण्यासाठी प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांनी लिहिले आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून आपला वारकरी संप्रदायाचा अभ्यास सिद्ध केलेले दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल १० अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाचे अप्रतिम संगीत निर्माण करणारे प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.