
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी नुकतंच ऐतिहासिक रायगड किल्ल्याला भेट दिली.रायगड किल्ला ,जो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेला हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो, कालांतराने थोडा दूरावस्थेत गेला असला तरी, त्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अद्याप टिकले आहे. आजही शिवप्रेमी तसेच पर्यटक या किल्ल्याकडे आकर्षित होतात.
परंतु, रायगड किल्ल्याला भेट देणाऱ्या अनेक पर्यटकांकडून कचरा करण्याची समस्या लक्षात येत आहे.प्रवीण तरडेंनी लेखक विश्वास पाटील यांच्याबरोबर रायगडाला भेट दिली. तेव्हा त्यांनी भिंतीमधील भेगांमध्ये कचरा पाहिला आणि याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत प्रवीण तरडे म्हणतात, “मी विश्वास पाटील सरांबरोबर रायगड पाहायला आलो आहे. इथल्या प्रत्येक भिंतीला, दगडाला हात लावताना असं वाटतं की, इथे कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पर्श केला असेल. म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या असण्याचा भास होतो.”आणि आपल्या लोकांनी काय केलंय ते बघायचंय का तुम्हाला??
या व्हिडिओ त्यांनी किल्ल्याच्या भिंतीच्या भेगांमधील कचरा, खाऊचे पॅकेट बाहेर काढून दाखवतात आणि म्हणतात, “ज्याने कुणी हा कचरा इथे असा टाकला असेल, त्या माणसाला मी मनापासून विनंती करतो की, तू पुन्हा रायगडावर येऊ नकोस, ही कचरा टाकायची जागा नाही. इथे आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला आहे, इथे त्यांनी आपले रक्त सांडलं. छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आहे. आजही महाराज इथे आहेत. ते कुठेही गेलेले नाहीत. याचं भान ठेवा”.
प्रविण तरडे यांनी पुढे म्हटले,“इथे जे जे पर्यटक येतात, त्यांना एकच विनंती आहे, आपला रायगड स्वच्छ ठेवा. रस्त्यावर कचरा असेल तर आम्ही उचलू, पण दगडांच्या भेगांमध्ये अडकलेला कचरा कसा बघणार, त्याचं काय करणार आणि हा कचरा शोधून तरी कसा काढणार… आपल्या राजांचा हा किल्ला आहे, राजधानी आहे; त्यामुळे त्याची आपणच काळजी घ्यायला हवी.”
यानंतर शिवाजी सावंत म्हणाले, “या भूमीला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श नाही, तर परीस स्पर्शही झाला आहे. लोखंडाला स्पर्श केल्यानंतर त्याचं सोनं होतं, तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी या परिसराचं सोनं केलं आहे.”