(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय आणि दिग्दर्शन या दोन भूमिकांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा सचित पाटील, ‘असंभव’च्या निमित्ताने आता निर्माता म्हणून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याच्या कारकिर्दीतील हा केवळ नवा टप्पा नसून सुमारे दोन दशकांच्या अनुभवातून तयार झालेले संचित आहे.
तीन वर्षांपूर्वी ‘असंभव’ची प्रक्रिया सुरु झाली. कथाकार कपिल भोपटकर यांनी जेव्हा सचित याला कथा ऐकवली, ती ऐकता क्षणी, ती मोठ्या पडद्यावर आणण्याचा निर्णय सचित याने घेतला. परंतु हा निर्णय प्रत्यक्षात उतरला, तो त्यांच्या जिवलग मित्राच्या प्रेरणेमुळे अर्थात नितीन प्रकाश वैद्य यांच्यामुळे.
आपल्या या नव्या प्रवासाबद्दल निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचित पाटील म्हणतो, ”कपिलची कथा इतकी प्रभावी होती की, ती मोठ्या पडद्यावर यायलाच हवी असं वाटलं आणि इथेच नितीन प्रकाश वैद्य माझ्यासोबत उभा राहिला. त्यानेच मला प्रेरणा दिली की, इतका दमदार विषय हातात असताना निर्माता म्हणून पहिलं पाऊल टाकण्याची हीच सुवर्णसंधी आहे. मी निर्मिती क्षेत्रात उतरलो, त्याचं संपूर्ण श्रेय नितीनलाच जातं.”
“ती पाणी मागत राहिली…” शेवटच्या क्षणी आईला पाणी देऊ शकला नाही ‘हा’ अभिनेता; म्हणाला,”आठवणी अजूनही…”
सचित पाटील आणि नितीन वैद्य यांची मैत्री अनेक वर्षांची आहे. दोघंही आपापल्या पहिल्या चित्रपटाच्या प्रवासात होते, तेव्हाच त्यांच्या मैत्रीचे सूर जुळून आले. एकत्र काम करण्याची इच्छा होती परंतु एकत्र काम करण्यासारखा योग्य विषय मिळण्याची त्यांना प्रतीक्षा करावी लागली आणि ही प्रतीक्षा ‘असंभव’ने संपवली.
सचित पाटील सोबतच्या सहयोगाबद्दल नितीन वैद्य म्हणतात, ” सचितला मी अनेक वर्षांपासून ओळखतो. आम्ही बोलत असू, विचारांची देवाणघेवाण होत असे, परंतु एकत्र काम करण्यासारखी कथा सापडत नव्हती. ‘असंभव’ समोर आला आणि आम्हाला दोघांना जाणवलं आपण मिळून काहीतरी मोठं, ठळक करू शकतो. यातूनच आम्ही ‘मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’ची स्थापना केली आणि ‘असंभव’ हीच आपली एकत्र पहिली कलाकृती असावी आणि ती प्रेक्षकांच्या भेटीस आणावी, असा निर्णय घेतला.’’
‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील याने केलं असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. मराठीतील चार गुणी कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. रहस्य, भावना आणि नात्यांच्या गुंफलेल्या कथेतून उलगडणारा हा थरारक चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.






