
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आज संपूर्ण राज्यभर मराठी रंगभूमी दिन साजरा होत असताना, या दिवसामागची प्रेरणादायी कथा पुन्हा एकदा उजळते आहे.
सन १८१९ मध्ये सांगलीचे अधिपती श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असलेल्या अमृतराव यांच्या घरी विष्णुदास भावे यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना कलाकारी, हस्तकलेचं आणि सर्जनशीलतेचं विलक्षण आकर्षण होतं. लाकडाच्या बाहुल्या तयार करून त्यांना जिवंत भासवण्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं होतं.
या कलागुणांच्या बळावर भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ हे नाटक बाहुल्यांच्या माध्यमातून सादर करण्याचा विचार केला. मात्र, त्या वेळी चिंतामणराव पटवर्धनांनी त्यांना सांगितलं. “अरे, हा खेळ बाहुल्यांपुरता नको, जसा भागवत मंडळी कीर्तनाचा खेळ करतात, तसा जिवंत खेळ रच!” आणि हाच क्षण ठरला मराठी रंगभूमीचा पहिला श्वास!
५ नोव्हेंबर १८४३ साली सांगलीच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉल’ येथे रंगलेल्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाने मराठी रंगभूमीचा पाया घातला. राजांच्या पाठबळावर झालेल्या या प्रयोगाने मराठी नाटकाला नवं आयुष्य दिलं आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी नाट्यसंस्कृतीचं दालन उघडलं.
‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटातून उलगडणार सासू-सुनेच्या नात्याची नवी गोष्ट
विष्णुदास भावे यांनी केवळ नाटक रचलं नाही, तर मराठी मनात नाट्यसंवेदना जागवल्या. म्हणूनच त्यांना मराठी रंगभूमीचे जनक मानलं जातं. त्यांच्या कार्याची परंपरा इतकी मजबूत झाली की, अनेक वर्षे नामांकित नाटक कंपन्या आपलं नवं नाटक प्रथम सांगलीतच सादर करीत.
“सांगलीत प्रयोग रंगला, म्हणजे सगळीकडे यश मिळणारच!” ही भावना कलाकारांच्या मनात घर करून राहिली होती.
आज, ५ नोव्हेंबरला रंगभूमी दिन साजरा करताना प्रत्येक कलाकार, दिग्दर्शक आणि नाट्यप्रेमी या परंपरेला अभिवादन करतो. विष्णुदास भावेंनी पेटवलेला रंगभूमीचा दिवा आजही तेजाने उजळत आहे.