
फोटो सौजन्य - Social Media
हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीत प्रथमच शहाजीराजे भोसले यांच्या जीवनावर आधारित कथा मोठ्या पडद्यावर आणणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. Chhatrapati Shivaji Maharaj यांचे वडील असलेले शहाजीराजे हे पराक्रमी, दूरदृष्टी असलेले आणि राजकारणात निपुण असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या शौर्य, कर्तृत्व आणि विचारांचा ठसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार आहे.
‘गोंधळ’नंतर संतोष डावखर पुन्हा एकदा वेगळ्या आणि आशयघन विषयासह प्रेक्षकांच्या भेटीला येत असून ‘शहाजीराजे’ हा चित्रपट २०२७ साली प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल सहा भाषांमध्ये सादर केला जाणार आहे, ज्यामुळे तो देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
चित्रपटात शहाजीराजेंची भूमिका कोण साकारणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका मोठ्या अभिनेत्याची एन्ट्री होण्याची चर्चा रंगली आहे. ‘गोंधळ’प्रमाणेच या चित्रपटातही थरार, भव्यता आणि प्रभावी कथानकाचा संगम पाहायला मिळेल का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढत आहे.
दिग्दर्शक संतोष डावखर यांनी सांगितले की, “महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ‘शहाजीराजे’ची घोषणा करणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी शहाजीराजे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.” त्यामुळे इतिहास आणि संस्कृतीचा गौरव मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.