
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
जगातील सर्वात सुरक्षित,निखळ, नि:स्वार्थ आणि कधीही न तुटणारे नाते म्हणजे ‘आई’. तिच्या उपस्थितीत मुलाला मिळणारा आधार, तिच्या डोळ्यात दिसणारी काळजी आणि तिच्या मिठीत सामावलेली शक्ती यांची तुलनाच होऊ शकत नाही. मुलाच्या पहिल्या रडण्यापासून ते जीवनातील प्रत्येक वळणापर्यंत आई सावलीसारखी त्याच्यासोबत उभी असते. ‘उत्तर’ या चित्रपटात हे असेच नाते अतिशय संवेदनशीलपणे, वास्तववादी आणि हृदयस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आले आहे. या नात्याच्या भावविश्वाला अधिक गहिरे करणारे नवीन गाणे ‘असेन मी’ प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, आईच्या नि:स्वार्थ प्रेमाची सुंदर व्याख्या या गाण्यातून अनुभवायला मिळते.
‘असेन मी’ या गाण्याला रोंकिणी गुप्ता यांचा सुरेल आणि भावपूर्ण आवाज लाभला आहे. तेजस आदित्य जोशी यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले असून क्षितिज पटवर्धन यांनी या गीतातील प्रत्येक ओळीत आईच्या प्रेमाचा सार, तिची ममता आणि मुलासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी प्रभावी शब्दात मांडली आहे. याआधी प्रदर्शित झालेले ‘हो आई’ हे गाणे मुलांचे आईवरील प्रेम दर्शवत होते, तर ‘असेन मी’ हे गाणे आईच्या प्रेमाचा निखळ प्रवास दाखवणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला आतापर्यंत सोशल मीडियावर पाच मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून आता या गाण्यालाही प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत आहे.
या गाण्याचे गीतकार तथा दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणाले, “ ‘असेन मी’ या गाण्यात प्रत्येक आईच्या मनातली भावना मांडली आहे. आईचे प्रेम शब्दांपलीकडचे असते. ते गाण्यात मांडणे माझ्यासाठी आव्हान होते. आई मुलाच्या या भावनिक नात्याला हे गाणे साजेसे आहे. प्रेक्षकांना हे भावपूर्ण गाणे नक्की आवडेल, याची मला खात्री आहे.”
2025 पूर्णपणे Akshaye Khannaच्या नावावर;धुरंधरमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिला सुपरहिट परफॉर्मन्स
झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर तसेच जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात रेणुका शहाणे आईच्या तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत ऋता दुर्गुळे आणि एका खास भूमिकेत निर्मिती सावंत सुद्धा दिसणार आहेत, या शिवाय पहिल्यांदाच ‘अनमिस’नावाचं एक एआय पात्र सुद्धा यात झळकणार आहे. दिग्दर्शनासह क्षितिज पटवर्धन यांनी ‘उत्तर’मध्ये कथा, पटकथा लिहिली आहे. येत्या १२ डिसेंबरला ‘उत्तर’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.