(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गावांतील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय घेत माती आणि नाती जोडणारी एक धमाल गोष्ट “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटातून समोर येणार आहे. उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. विजय कलमकर दिग्दर्शित या चित्रपटाची चित्रपटसृष्टीत सध्या जोरदार चर्चा असून, १९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रोडक्शन्स या निर्मिती संस्थानी “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमरजित आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे, एम. व्ही. शरतचंद्र हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजित आमले यांनी, तर दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केले आहे. अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून अभिनेते सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.
तब्बल २० वर्षांनी गायक अभिजीत सावंतने केली ‘ही’ गोष्ट, म्हणाला ‘आयुष्यातील मोठी संधी…’
रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी या चित्रपटाचे छायांकन केले आहे. तर विजय कलमकर यांनी संकलन केले आहे. तसेच, अविनाश सोनावणे यांनी ध्वनिआरेखनची जबाबदारी पार पडली आहे. चंचल काळे, अमरजित आमले यांनी या चित्रपटाचे गीतलेखन केले आहे. अक्षय खोत यांनी संगीत दिग्दर्शन, पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे तर वितरक म्हणून पिकल इंटरटेनमेंट काम पाहणार आहे.
एकीकडे देशाची विकसित होण्याकडे वाटचाल होत असताना शहरे आणि ग्रामीण भाग अशी एक दरीही निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांची लग्ने रखडत आहेत. मुलींच्या वाढत असलेल्या आकांक्षा यासह अनेक सामाजिक मुद्दे या समस्येशी जोडलेले आहेत. तसेच हा प्रश्न केवळ गावांपुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर राज्यभरात अगदी शहरांमध्ये मुलांचे रखडणारे लग्न हा सामाजिक प्रश्न म्हणून पुढे येत आहे. या प्रश्नाची अत्यंत मनोरंजक पद्धतीने हाताळणी “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटात करण्यात आली आहे.
कथेच्या सादरीकरणासाठी कोकणातली पार्श्वभूमी घेऊन चित्रित झालेल्या या चित्रपटामध्ये कोकणातील इरसाल स्वभावाची माणसे दाखवत ही अनोखी गोष्ट उलगडण्यात आल्याचे टीजरमधून दिसून येत आहे. त्यामुळेच या चित्रपटाविषयी आता उत्कंठा वाढली आहे. माती आणि नाती जोडणारा, प्रत्येक कुटुंबाची गोष्ट सांगणारा “कुर्ला टू वेंगुर्ला” हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आवर्जून पहावा असा आहे. हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरला संपूर्ण सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.