“जब्याला काळी चिमणी गावली!” राजेश्वरी- सोमनाथने गुपचूप उरकले लग्न; लग्नाचे फोटो पाहून नेटकरी संभ्रमात
नागराज मंजुळेंच्या ‘फँड्री’ सिनेमाची प्रेक्षकांमध्ये फार मोठी क्रेझ आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०१४ ला महाराष्ट्रात रिलीज झाला होता. चित्रपट रिलीज होऊन १० वर्षे झाली असली तरीही या चित्रपटातील जोडी आजही प्रेक्षकांमध्ये चांगलीच फेमस आहे. शालू आणि जब्या हे चित्रपटातील दोन फेमस पात्र. या पात्रांना महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. चित्रपट रिलीज होऊन इतकी वर्ष झाली असली तरीही जब्या- शालूची जोरदार चर्चा होत आहे. सध्या दोघांचेही सोशल मीडियावर हळदीतले फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल फोटो पाहून चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.
चित्रपटामध्ये, शालूचे पात्र राजेश्वरी खरातने साकारले आहे, तर जब्याचे पात्र सोमनाथ अवघडेने साकारले होते. या दोन्हीही नवख्या कलाकाराला महाराष्ट्रातल्या घराघरांत विशेष प्रसिद्धी मिळाली. राजेश्वरी आणि सोमनाथला चाहते आजही शालू-जब्या या नावानेच ओळखतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राजेश्वरी आणि सोमनाथचा हळद लागतानाचा फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दोघंही पाटावर एकमेकांच्या बाजू बाजूला बसलेले दिसत आहे. फोटोमध्ये, राजेश्वरीच्या हातात हिरवा चुडा, डोक्याला मुंडावळ्या आणि पिवळी सिंपल साडी असा लूक अभिनेत्रीचा दिसतोय.
तर सोमनाथने व्हाईट कलरचा कुर्ता आणि पायजमा, डोक्यावर टोपी, अंगावर शाल आणि मुंडावळ्या बांधल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. हळदीचे आणि लग्नाचे फोटो राजेश्वरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. लग्नातलाही दोघांचा लूक चाहत्यांच्या पसंदीस पडला आहे. सोमनाथ आणि राजेश्वरीने नेमकं खरोखर लग्न केलं आहे का ? अशी चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे. राजेश्वरीने लग्नाचे आणि हळदीचे फोटो शेअर करताना कोणतंही कॅप्शन न दिल्याने “तुमचं खरंच लग्न झालंय की, शूटिंगसाठी हे करताय” असे सवाल नेटकऱ्यांनी या दोघांना कमेंट्समध्ये विचारला आहे.
“शूटिंग आहे मित्रांनो! लाईक Views साठी ती मुद्दाम सांगत नाहीये”, “डायरेक्टर गरीब आहे वाटतं जब्याला चप्पल पण नाही दिली नीट”, “शेवटी जब्याला काळी चिमणी गावलीच.”, “खरंच लग्न झालंय का?”, “मित्रांनो हा Fandry 2 चा शॉट आहे ज्यात त्यांचं लग्न होणार आहे… हा सिनेमा २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.”, “शूटिंगचे फोटो आहेत”, “अरे बाबा आम्हाला वेड्यात काढू नका. खरं आहे की खोटं सांगून टाका एकदा” राजेश्वरीने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी अशा कमेंट्स केल्या आहेत.