
rakhi sawant
हिंदी मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन (Drama Queen Rakhi) म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी राखी सावंतने(Rakhi Sawant) तिचा पती आदिल खानवर गंभीर आरोप केले होते. आता आदिल पोलिसांच्या ताब्यात आहे. आदिलसोबतचा वाद सुरु असतानाच राखीने नवीन सुरुवात करण्याचं ठरवलं आहे.
राखी सावंत नुकतीच दुबईला (Dubai) रवाना झाली. या दरम्यानचा तिचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. यात ती मुंबई विमानतळावर दिसत आहे. व्हिडिओद्वारे तिने तिच्या नव्या इनिंगची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ती लवकरच दुबईत तिची स्वतःची अॅकॅडमी सुरू करत असल्यास तिने सांगितलं आहे.
याच अॅकॅडमीच्या उद्घाटनासाठी राखी दुबईला रवाना झाली आहे. या तिच्या नवीन अॅक्टिंग अॅकॅडमीचं नाव ‘राखी सावंत अकॅडमी’ असं आहे. राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अकॅडमीविषयीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली, “मी आता विमानतळावर आहे आणि दुबईला जाण्यासाठी तयार आहे. तुम्ही उत्सुक आहात ना? माझी अॅकॅडमी सुरू होत आहे. राखी सावंत अकॅडमी. लवकरात लवकर तुम्ही या अॅकॅडमीत प्रवेश घ्या. मीही बघते दुबईतून या अॅकॅडमीत प्रवेश घ्यायला कोण कोण येतंय.”
आता तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काहीजण नवीन अॅकॅडमी सुरू केल्याबद्दल तिचं कौतुक करत आहेत. दुसरीकडे काहींनी तिच्या या नव्या उद्योगाबद्दल तिला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “तुला भेटायला दुबईत कोण येणार! तू काय नोरा फतेही आहेस का?” तर आणखी एकाने लिहिलं की, “हिच्याकडून अभिनय शिकण्यापेक्षा मी हे क्षेत्रच न निवडलेलं बरं.”
राखी सावंतच्या या नव्या अकॅडमीला आता लोक कसा प्रतिसाद देतात आणि या अकॅडमीमध्ये कोण शिकायला येणार ? याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे.