फोटो सौजन्य: Social Media
मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपट हे नेहमीच विविध विषयांवर बेतलेले असतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील हे चित्रपट गौरविले जातात. आता तर पहिल्यांदाच मराठी ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म New York Indian Film Festival मध्ये सादर केली जाणार आहे. यातील महत्वाची गोष्ट म्हणजे ही मराठी ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी दिग्दर्शित केली आहे.
अभिनेत्री रेणुका शहाणे यांची मराठी ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म Loop Line न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखवला जाणार आहे. यामुळे पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत एखादी ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये दाखवली जाणार आहे, जी गौरवाची बाब आहे.
ही शॉर्ट फिल्म येत्या 21 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. पुरुषप्रधान कुटुंबांमध्ये अडकलेल्या मध्यम वर्गीय गृहिणींची होणारी घालमेल हा या शॉर्ट फिल्मचा विषय आहे.
Kedarnath Helicopter Crash वर राहुल वैद्यने व्यक्त केला संताप, म्हणाला ‘मानवी जीवनाचे शून्य मूल्य…’
चित्रपट आणि NYIFF (न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल) याबाबत बोलताना रेणुका शहाणे यांनी एका निवेदनात सांगितले, “’लूप लाईन’ ही केवळ एक अॅनिमेटेड शॉर्टफिल्म नसून प्रत्यक्षात साकारलेले एक स्वप्न आहे. न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलसाठी त्याची निवड झाल्याचा मला अपार आनंद आहे. हा सन्मान माझ्या टीमच्या अतूट मेहनतीचे आणि त्यांच्या उत्कटतेचे प्रतीक आहे.”
रेणुका यांनी पुढे सांगितले की, त्या या चित्रपटाच्या स्क्रीनिंगची आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
“ही निवड म्हणजे आपल्या कथाकथनातील एकत्रित समर्पणाचा उत्सव आहे, जो आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोहोचत आहे,” असे त्या म्हणाल्या.
‘लूप लाईन’ हा चित्रपट मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित असून, एका मध्यमवयीन गृहिणीची कथा सांगतो. ही स्त्री घरकामाच्या एकसुरी जीवनात अडकलेली असते आणि तिचा नवरा दबंग व पुरुषसत्ताक विचारसरणी असलेला असतो.
तिच्या कल्पनाशक्तीतच ती विसावते, परंतु जेव्हा तिचा नवरा त्याच्या लैंगिकतावादी मित्रांसह घरी परततो, तेव्हा तिच्या स्वप्नसृष्टीचा विस्कटलेला नूर समोर येतो. एका अमानवी टिप्पणीनंतर, ती त्यांना तिच्या कल्पनांमधून साकारलेल्या मेंदूच्या पदार्थाने जेवण घालते, अशी कल्पना चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
या चित्रपटासाठी अॅनिमेशन पेपरबोट डिझाईन स्टुडिओने केले आहे, ज्याची स्थापना सौमित्र रानडे, मयंक पटेल आणि आशिष मॉल यांनी केली आहे.
चित्रपटात मिताली जगताप वराडकर आणि आनंद अलकुंटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या प्रारंभिक व्हिज्युअलायझेशनमध्ये त्यांनी हे पात्र साकारले होते, ज्याचा उपयोग अंतिम अॅनिमेशनसाठी केला गेला.
तांत्रिक बाजूसाठी साउंड डिझायनर अनमोल भावे, संगीत दिग्दर्शक मंगेश धाकडे, कला दिग्दर्शक शैलेश आंब्रे आणि अॅनिमेशन दिग्दर्शक महेंद्र कावळे यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
रेणुका शहाणे यांनी याआधी ‘रीता’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते, ज्यात जॅकी श्रॉफ, पल्लवी जोशी, सई ताम्हणकर आणि स्वतः शहाणे यांची प्रमुख भूमिका होती. त्यानंतर त्यांनी नेटफ्लिक्सवरील ‘त्रिभंगा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, ज्यामध्ये काजोल आणि मिथिला पालकर होत्या.