मुलाच्या मृत्यूची खोटी बातमी कोणी पसरवली? पोस्ट शेअर करत रेशम टिपणीस संतापली
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये रेशम टिपणीस हिची गणना केली जाते. तिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं निखळ मनोरंजन केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री फिल्म इंडस्ट्रीपासून दुर आहे. सध्या रेशम खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्रीच्या मुलाबद्दल काही अफवा पसरवल्या जात असून त्या प्रकरणावर अभिनेत्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रेशम टिपणीस हिच्या मुलाने आत्महत्या केल्याची सोशल मीडियावर अफवा पसरली आहे. मुलाची अफवा पसरल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. असं कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करायला हवी, असा इशारा अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिला आहे. सध्या रेशम हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रेशम टिपणीसने पोस्ट शेअर करत म्हटले की, “कृपया खोटी बातमी पसरवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. बाप्पाच्या कृपेने माझा मुलगा मानव बरा आणि ठणठणीत आहे. पण हे ज्याने कोणी केले आहे, त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.” रेशमच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
लव्ह आणि रिलेशनशिपबद्दल उघडपणे मांडले नीना गुप्ता यांनी स्वतःचे मत, म्हणाल्या- ‘मला दिखावा आवडतो…’
नेमकी घटना काय आहे ?
बुधवारी संध्याकाळी कांदिवलीमध्ये राहणाऱ्या गुजराती अभिनेत्रीच्या मुलाने ५६ व्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचं जीवन संपवलं आहे. वयाच्या ८ व्या वर्षी अभिनेत्रीच्या मुलाने टोकाचा निर्णय घेतला. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. आईने ट्यूशनला जायला सांगितल्यानंतर राग आलेल्या मुलाने ५६ व्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आहे. एका वेब पोर्टलने, अभिनेत्री रेशम टिपणीस आणि तिच्या मुलाचा फोटो शेअर केलेला होता. त्यानंतर ही बातमी व्हायरल झाली आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली. त्यानंतर रेशम चांगलीच संतापली आणि तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हे वृत्त फेटाळून लावले. दरम्यान, मानव हा रेशम आणि तिचा एक्स पती संजीव सेठ यांचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे ते चर्चेत आले होते.