sachin tendulkar on baipan bhari deva
सध्या महाराष्ट्रात ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या निमित्ताने उत्सवासारखं वातावरण दिसतंय. कित्येक वर्षांनी एखाद्या चित्रपटासाठी नटून थटून, वेळातून वेळ काढून, अनेक मैलांचा प्रवास करून, वेगवेगळ्या वयोगटातील महिला चित्रपट बघायला येत आहेत. पण आता यात पुरुषही मागे राहिले नाहीयेत.आता नवं चित्र दिसतं आहे ते म्हणजे तेवढ्याच उत्साहाने पुरुषदेखील कुटुंबासमवेत सिनेमागृहांमधे हा चित्रपट बघताना दिसून येत आहेत.
चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटून गेलाय तरीही ‘बाईपण भारी देवा’ची क्रेझ टिकून आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी नुकताच हा चित्रपट आपली पत्नी अंजली तेंडुलकर आणि मित्र परिवारासह पाहिला. त्यांनी आपल्या आईला ही फिल्म दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Falling apart only to grow closer, ‘बाईपण भारी देवा’ is a touching story about 6 sisters. I really enjoyed watching this Marathi movie and I can’t wait for my mother and aunt to watch it too. Plus, meeting the cast was a lovely experience! pic.twitter.com/6JFVEohjjQ
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 6, 2023
सचिन आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचं कौतुक करत म्हणाला की, ‘बाईपण भारी देवा’ ही 6 बहिणींची हृदयस्पर्शी कथा आहे. मला हा मराठी चित्रपट पाहून खूप आनंद झाला आणि कधी एकदा माझी आई आणि आत्या हा चित्रपट बघतायत याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. तसेच चित्रपटाच्या कलाकारांना भेटणे हा एक सुंदर अनुभव होता!
चित्रपट पाहिल्यानंतर सचिनने चित्रपटाच्या कलाकारांशी, दिग्दर्शक, लेखक तसेच संपूर्ण टीमशी गप्पा मारल्या व त्यांच्या कामाचं भरभरुन कौतुक ही केले. बॉलिवूड हॉलिवूड चित्रपटांना बरोबरीने टक्कर देत ‘बाईपण भारी देवा’ने बॉक्स ऑफिसवर सत्ता गाजवत सुपरडुपर हिटचा झेंडा फडकवला आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी- मोने, शिल्पा नवलकर आणि दीपा परब- चौधरी अभिनित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओजनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे आहेत. चित्रपटातील कलाकारांचा उत्तम अभिनय, उत्कृष्ट कथानक, सुरेल गाणी अन् दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटाने, इतर अनेक चित्रपटांना मागे टाकत, आपला जोरदार ठसा उमटवला आहे हे नक्की !