स्पृहा जोशीने आई- वडिलांचा फोटो शेअर करत चाहत्यांचे मानले आभार, नेमकं काय झालं ?
इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री, कवियित्री आणि गीतकार स्पृहा जोशी कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. तिने आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकेंच्या जोरावर चाहत्यांमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. नुकताच स्पृहा जोशीचा वाढदिवस झाला. अभिनेत्रीचा वाढदिवस १३ ऑक्टोबरला असतो. अभिनेत्रीला आपल्या वाढदिवशी चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतल्या मित्र- मैत्रिणींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पण तिला काही कारणास्तव त्या शुभेच्छा स्वीकारता आल्या नाहीत. याच कारण सांगत तिने सर्वांचीच माफी मागितली आहे.
स्पृहाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आई- बाबांचा हॉस्पिटलमधला फोटो शेअर केला आहे आणि पुढे कॅप्शनही लिहिलं आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने वाढदिवसाच्या शुभेच्छा का नाही स्वीकारता आल्या, याचं कारण तिने सांगितले आहे. शिवाय तिने आई- वडिलांच्या हेल्थबद्दलही माहिती दिली आहे.
हे देखील वाचा – “अलविदा अतुल”, अतुल परचुरेंच्या निधनानंतर किरण मानेंनी शेअर केली खास पोस्ट
शेअर केलेल्या पोस्टमध्ये स्पृहा म्हणाली, “१३ ऑक्टोबरला झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अजून येतायत.. आई बाबांची तब्येत सुधारतेय… पुण्यातल्या बाणेरमधल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पेशंटची आणि पेशंटच्या नातेवाईकांची प्रेमाने काळजी घेतायत… सगळे स्नेही, आप्तेष्ट, मित्र “काहीही लागलं तरी सांग” म्हणून दिलासा देतायत… इतकी माणसं जोडलेली असणं ही त्या दोघांची पुण्याई… आपल्यावर प्रेम करणारी इतकी माणसं आहेत, ही भावना फार मन भरून टाकणारी आहे. मी तुम्हा सगळ्यांची ऋणी आहे. प्रत्येकाला उत्तर देणं जमलं नाही.. रागावू नका .. लोभ आहेच, तो वाढत राहो ..!!”
स्पृहाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला दिलासा दिला आहे. ‘आईबाबा लवकर बरे होऊन घरी येतील’ अशा कमेंट्स चाहते करत आहेत. नक्की स्पृहाच्या आई- बाबांना हॉस्पिटलमध्ये का ॲडमिट केलंय, याचं कारण समजू शकलेलं नाही. शिवाय, तिला चाहत्यांनीही आई- बाबांना काय झालंय ? असा प्रश्न विचारला. यावर स्पृहाने अजून काहीही माहिती दिलेली नाही.