'जाट' चित्रपटातील रणदीप हुड्डाच्या 'त्या' सीनवर आक्षेप; दिग्दर्शकांचं उत्तर काय?
बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांचा ‘जाट’ हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करताना दिसत आहे. पण आता ‘जाट’ चित्रपटातील एका दृश्यावरून वाद निर्माण झाला आहे. ख्रिश्चन समुदायाच्या लोकांनी चित्रपटातील रणदीप हुड्डाच्या एका सीनवर आक्षेप व्यक्त केला आहे. चित्रपटात रणदीप हुड्डा चर्चच्या समोर असणाऱ्या क्रॉससमोर उभा आहे आणि तो क्रुस सारखा उभा असलेला दिसत आहे. अनेकांनी या दृश्यावर आपला आक्षेप नोंदवला आहे. अशा परिस्थितीत, आता ‘जाट’ चित्रपटाचे दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.
“सेन्सॉर बोर्डाने ट्रेलर कट करताना काहीही उल्लेख केला नव्हता, परंतु नंतर चित्रपटातल्या काही सीन्समध्ये बॅकग्राऊंडमध्ये ब्लर करण्यासाठी सांगितले होते. प्रेक्षकांनी त्या सीनवर नाराजी व्यक्त करण्यापूर्वीच आम्ही ते केलेही होते. जर एखादा चित्रपट हिट करायचा असेल, तर त्याला जास्तीत जास्त लोकांनी तो पाहणे महत्वाचे आहे. कोणताही चित्रपट निर्माता कोणत्याही समुदायाच्या लोकांना दुखवू इच्छित नाही. आमचे ध्येय लोकांचे मनोरंजन करणे आहे.” अशी प्रतिक्रिया ‘जाट’ चित्रपटाचे दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत दिली. ‘जाट’ चित्रपटातील एका दृश्यावरून वाद वाढल्यानंतर, निर्मात्यांनी एक निवेदन जारी करून चित्रपटातील वादग्रस्त दृश्य काढून टाकण्यात आल्याची माहिती दिली. यासोबतच त्यांनी लोकांची माफीही मागितली. त्याच वेळी, शेअर केलेल्या अधिकृत निवेदनात, त्यांचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही हे स्पष्ट करण्यात आले. पण यानंतरही या प्रकरणावरील वाद संपताना दिसत नाही.
‘जाट’ चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शकाविरोधात जालंधरच्या पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओल, रणदीप हुड्डा, विनीत कुमार, दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी , निर्माते नवीन येरनेनी यांच्याविरुद्ध जालंधरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल कलम २९९ बीएनएस अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपटातल्या कलाकारांवर, दिग्दर्शकांवर आणि निर्मात्यांवर एफआयआरमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, रणदीप हुड्डाने येशू ख्रिस्त आणि ख्रिश्चन धर्मात वापरल्या जाणाऱ्या पवित्र गोष्टींचा अनादर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ख्रिश्चन समुदाय त्या प्रकरणाचा संताप व्यक्त करत आहे. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांवर त्यांच्या चित्रपटात धार्मिक चिन्हाचा अपमान करणारे असे सीन समाविष्ट केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आरोपांची निष्पक्षपणे चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.
‘तुम्हारी आँखे है या छुरी, बडे गहरे घाव किया करते है..’ दागिन्यांमध्ये सजले टिनाचे तेज!
‘जाट’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील यशादरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही घोषणा केली. सध्या दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी त्यांच्या एका अपकमिंग तेलुगू चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. यानंतर ते ‘जाट २’ चित्रपटाच्या स्टोरीवर काम करतील.