'छावा' चित्रपटात कान्होजी शिर्केंची भूमिका का साकारली? सुव्रत जोशीने अखेर मौन सोडले
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची अजूनही चाहत्यांमध्ये क्रेझ कायम आहे. १४ फेब्रुवारीला देशासह परदेशामध्ये चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपट रिलीज होऊन ५८ दिवस झाले आहेत. तरीही चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटामध्ये कान्होजी शिर्केंची नकारात्मक भूमिका अभिनेता सुव्रत जोशीने साकारली आहे.
या नकारात्मक भूमिकेमुळे अभिनेत्याला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. पण असं असलं तरीही त्याने साकारलेल्या भूमिकेने साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत. त्याच्या अभिनयाचे चाहत्यांनी कौतुकही केले. अनेक दिवसांनंतर आता सुव्रतने कान्होजी शिर्केंची नकारात्मक भूमिका साकारण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने कान्होजी शिर्केंची भूमिका त्याच्याकडे कशी आली याबाबत सांगितलं आहे. शिवाय ‘छावा’ चित्रपटात निगेटिव्ह पात्रात दिसण्याबाबत त्याने मौन सोडलं आहे.
” ‘जब वी मेट २’ आला तर गीतसाठी तू करेक्ट…”, रुपाली भोसले नेमकं कोणाला म्हणाली ?
कान्होजी शिर्केंच्या भूमिकेबद्दल अभिनेता सुव्रत जोशी काय म्हणाला ?
“हम नमक है महाराज, तुम तिलक हो हमारे माथे का”
ह्या चित्रपटाचा भाग असल्याचा आनंद आहे. चित्रपटगृहात गाजल्यानंतर आता हा चित्रपट Netflix वर देखील प्रदर्शित झाला आहे. तरी रसिकप्रेक्षकांनी आनंद घ्यावा…
“Chaava” Streaming on Netflix now
छावा प्रदर्शित झाल्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. अनेक प्रेमाने, कौतुकाने भरलेले संदेश. तर काही दाहक, राग राग करणारे… मला ते अपेक्षितच होते. किंबहुना तीच माझ्या कामाची पावती होती असे मी समजतो. पण तरीही काहींनी अगदी व्याकुळतेने “मी ही भूमिका का स्वीकारली”असे विचारले. तर त्याविषयी थोडेसे… सर्वप्रथम एखादी भूमिका तुम्हाला विचारली जाते तेव्हा समोर अनेक भूमिकेचे पत्ते टाकून, तुम्हाला कुठली भूमिका हवी तो पत्ता उचला अश्या पद्धतीचे स्वातंत्र्य तुम्हाला नसते. त्यामागे दिग्दर्शक, निर्माते आणि कास्टिंग डायरेक्टर यांनी भरपूर वेळ घालवलेला असतो. विचारांती तुम्हाला एकच भूमिका दिलेली असते. तशी ही भूमिका माझ्याकडे चालून आली. आता कुठलीही भूमिका निवडताना मी फक्त “नाट्यशास्त्राचे “ ऐकतो. नाट्यशास्त्र भूमिकेचेवर्णनात “पात्र “ असे करते. त्यामुळे कुठलीही गोष्ट, भावना, व्यक्ती धारण करणे हा नटाचा धर्म असतो. पण मग उठून कुठलीही भूमिका करावी का? तर अजिबातच नाही. तर मी ज्या कलाकृतीचा भाग होणार आहे ती कलाकृती व्यापक अर्थाने काय सांगू पाहती आहे याचा विचार आपण करायचा. ती कलाकृती जे सांगते आहे , जो अनुभव देऊ पाहणार आहे ते आपल्याला पटत असेल तर मग त्या कलाकृतीत आपल्याला कुठल्याही ढंगाची भूमिका आली तरी मी स्वीकारतो. कारण अंतिमतः आपण एक चांगली गोष्ट पोहोचवायला हातभार लावतोय. अहो अगदी शाळेच्या नाटकातही कुणाला तरी लबाड कोल्हा तर कुणाला म्हातारी व्हावे लागतेच. स्वत्व सोडून परकाया प्रवेश हे आमचे कर्तव्य आणि आमची चैन आहे. त्याला अनुसरून मी आमच्या नाट्यधर्माचे पालन करतो. माझा अल्प अनुभव आणि शिक्षण सांगते की असे करणे हेच प्रगल्भ नटाचे काम आहे .
अभिनेते प्रकाश राज यांनी घेतली कुणाल कामराची भेट, ट्विट करत एकनाथ शिंदेंना डिवचलं
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाला चित्रपटप्रेमींनी खूप प्रेम दिलं. ‘छावा’ 11 एप्रिल रोजी (Chhaava OTT Release Date) ‘नेटफ्लिक्स’ (Netflix)या प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायचा असल्यास त्यांना पैसे देऊन तो पाहता येऊ शकतो. पण हा चित्रपट केव्हा फ्री होईल, हे ठाऊक नाही. ‘छावा’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याने साकारलेल्या भूमिकेला देशासह परदेशातून प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे. त्याचा अभिनय पाहून विकी कौशलचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे. महाराणी येसूबाईंची भूमिका ही लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे, तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात संतोष जुवेकर, शुंभकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहे. सर्वच कलाकारांचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक कंपनीने केली आहे.