(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली सोढी या सध्या स्टेज ४ कॅन्सरशी झुंज देत आहेत. कॅन्सरमुळे अभिनेत्रीच्या डोक्यावरील संपूर्ण केस गळाले आहेत. कॅन्सरवर उपचार घेताना त्यांची काय अवस्था झाली याविषयी त्यांनी खुलासा केला आहे. अभिनेत्रीने केमोथेरपी सुरू केली आहे, ज्यामुळे केस गळाले आहेत.नफीसा अली यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या बाल्ड लूकमध्ये दिसत आहेत. कॅन्सरशी झुंज देत असताना देखील त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे.
या फोटोसोबत त्यांनी एक प्रेरणादायक संदेशही लिहिला आहे. शारीरिक दुखण्याचा सामना करत असूनही आनंदी राहण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, केमोथेरपी उपचारांमुळे केस गळाल्यानंतर त्यांनी हा लूक स्वीकारला आहे. तरीही मनातून आनंदी राहण्याचा त्या प्रयत्न करत आहेत.
नफीसा अली यांचा जीवनप्रवास खरोखरच प्रेरणादायक आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांना स्टेज ४ चा पेरिटोनियल आणि ओव्हेरियन कॅन्सर असल्याचे निदान झाले, आणि तरीही त्यांनी खचून न जाता, त्या आजाराशी धैर्याने आणि सकारात्मकतेने सामना केला.
दसरा-दिवाळीत धमाका! दर शुक्रवारी नवीन सिनेमा फक्त अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर
नफीसा अली यांनी १८ सप्टेंबर रोजी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये लिहिले होते, “आज माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होत आहे. काल माझे पीईटी स्कॅन झाले होते, म्हणून आता मी केमोथेरपीकडे परतत आहे कारण शस्त्रक्रिया आता शक्य नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, मला जीवन खूप आवडते.”
६८ वर्षीय अभिनेत्री नफीसा अली बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांनी मेजर साहब या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. नफीसा अली या एक अभिनेत्री असण्यासोबतच माजी ‘मिस इंडिया’, उत्तम जलतरणपटू आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. ‘लाईफ इन अ मेट्रो’ सिनेमात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.