(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ऑक्टोबर महिन्यात दसरा-दिवाळी सणांच्या उत्साहात मनोरंजनात आणखीन भर टाकण्यासाठी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर रंगणार चित्रपटांचा रंगीत महोत्सव. या महिन्यात प्रत्येक आठवड्यातील दर शुक्रवारी तुमच्यासाठी येणार आहेत साऊथ, बांग्ला, हिंदी ब्लॉकबस्टर सिनेमे तेही तुमच्या मायबोली मराठीत. आता खऱ्या अर्थाने सणांचा आनंद दुप्पट होणार.
बबलगम (रंग प्रेमाचे) : प्रेमातील नात्यांच्या चढउतारांचा हृदयस्पर्शी प्रवास
‘बबलगम’ हा रविकांत पेरेपु दिग्दर्शित तेलुगू चित्रपट ३ ऑक्टोबर, २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे. आदी आणि जान्हवी यांच्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आहे. वेगवेगळ्या जीवनप्रवासातून आलेले हे दोघं, त्यांच्या नात्यातील शंका आणि आव्हानांशी झुंज देत असतात. पण काय खरं प्रेम त्यांच्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करू शकेल का? या एका प्रश्नाभोवती फिरणारा हा रोमँटिक-ऍक्शन ड्रामा चित्रपट प्रेक्षकांना नात्यांच्या रंगीबेरंगी आणि भावनिक सफरीवर घेऊन जातो. या चित्रपटात रोशन कनाकाला, मानसा चौधरी, हर्षा चेमुडु, चैतू जोन्नालगड्डा आणि अनु हासन यांचा अभिनय पहायला मिळेल.
मिशन एक्स्ट्रीम २ (युद्ध संग्राम) : धाडस, गुप्तचर आणि घातक संघर्षाची गाथा
‘मिशन एक्स्ट्रीम २ – ‘ब्लॅक वॉर’ हा सनी सनवार आणि फैजल अहमद दिग्दर्शित बांग्ला ॲक्शन-थ्रिलर चित्रपट १० ऑक्टोबर, २०२५ ला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे. एका दहशतवादी संघटनेचा नेता राष्ट्राच्या स्थिरतेवर मोठा डाव आखतो. एडीसी नबिद या कटाचा शोध काढण्यासाठी झटतो, पण अचानक घडणाऱ्या सलग हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनते. रोमांचक ॲक्शन, गूढ शत्रूचा शोध आणि उत्कंठावर्धक घडामोडींनी भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. चित्रपटात अरिफिन शुवो, तस्कीन रहमान,सादिया नबीला आणि मिशा सावदगोर यांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.
पेट्टा रॅप (झिंग कलेची) : प्रेम, संगीत आणि ॲक्शनचा कमाल संगम!
‘पेट्टा रॅप’ हा एस. जे. सीनू दिग्दर्शित तमिळ रोमँटिक-ॲक्शन-कॉमेडी म्युझिकल चित्रपट १७ ऑक्टोबर, २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत प्रभुदेवा आणि वेदिका तुम्हाला पाहायला मिळतील. बाला (प्रभुदेवा) याचं स्वप्न आहे एक खरा ॲक्शन हिरो बनण्याचं, तर त्याची क्लासमेट जानकी (वेदिका) अपयशी प्रेमप्रकरणानंतर पॉप सिंगर बनते. प्रेम, संगीत, कॉमेडी आणि ड्रामाने भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच रंगतदार मनोरंजनाचा अनुभव देईल.
द फ्रिज (गोठलेलं रहस्य) : भयानक रहस्याचा थरारक उलगडा!
‘द फ्रिज’ हा दिपक तुलसी दिग्दर्शित हिंदी हॉरर-सस्पेन्स चित्रपट २४ ऑक्टोबर, २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर मराठीत प्रदर्शित होणार आहे. अरमान आणि त्याची पत्नी शीला यांच्या सुखी आयुष्यात अचानक अंधार पसरतो, जेव्हा शीलाची खास मैत्रीण बॉबी त्याला एकटी भेटायला येते. एका रात्री झालेल्या चुकीमुळे बॉबीचा अपघाती मृत्यू होतो. घाबरून गेलेला अरमान आणि त्याचा नोकर शंभू तिची डेड बॉडी एका फ्रीजमध्ये लपवून ठेवतात. पण, जेव्हा शीला अनपेक्षितपणे घरी परतते, तेव्हा विचित्र आणि भीतीदायक घटनांची मालिका सुरू होते. भीती, रहस्य आणि अंगावर शहारे आणणारा थरार देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. चित्रपटात हितेन मेघराजानी, शेरोन पांडे, रुचि तिवारी, मनीष खन्ना आणि ब्रिजेश बर्णवाल यांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.
प्राणदा तुझा श्वास दे मला : आत्मविश्वास, संघर्ष आणि नव्याची उमेद!
‘प्राणदा तुझा श्वास दे मला’ हा मराठी चित्रपट कोरोना काळातील एका तरुणाच्या जीवनाभोवती फिरतो, जो आपल्या स्वप्नांच्या अपयशामुळे हरवतो. नशा, तणाव आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे त्याच्या आयुष्यात खूप बदल घडतात. अशा कठीण काळात त्याच्या आयुष्यात दोन व्यक्ती येतात – एक जी त्याला भविष्याची दिशा दाखवते आणि दुसरी जी त्याला संघर्षातून जगण्याची नवी उमेद देते. हळूहळू, या अनुभवांमुळे तो स्वतःशी आणि आयुष्याशी लढण्यास तयार होतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले असून, वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे. चित्रपटात सायली संजीव, अभिजित आमकर, मोहन जोशी, योगेश सोमन, श्रद्धा जावळकर, राज कुंडन, नेहा मिराजकर आणि योगेश भोसले यांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “यंदाचा ऑक्टोबर महिना म्हणजे दसरा-दिवाळी सणांचा आनंद, प्रकाश आणि उत्साह! या सणांच्या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालण्यासाठी आम्ही अल्ट्रा झकास मराठीवर खास असे दर्जेदार आणि मनाला भिडणारा कंटेंट घेऊन येत आहोत. आमच्यासाठी कंटेंटचा अर्थ फक्त करमणूक नाही, तर प्रत्येक कथा प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करेल, त्यांना भावनांमध्ये गुंतवेल आणि सणांचा उत्साह दुप्पट करेल.”