
फोटो सौजन्य - Social Media
एकमेकांच्या सोबतीने आयुष्यातील प्रत्येक आव्हान पेलणाऱ्या या जोडीसमोर आता नात्यात दुरावा निर्माण करणाऱ्या कटकारस्थानांचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. श्रीकलाविरुद्धच्या या लढाईत इंदूला मोठ्याबाईंची साथ लाभली असून, आनंदी आणि इंदू घरात राहूनच श्रीकलाचे डाव उधळून लावण्याचा निर्धार करतात. योग्य वेळ येताच तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा, असा ठाम निर्णय दोघी घेतात. मात्र या सगळ्या नियोजनाच्या दरम्यान इंदू आणि अधोक्षजच्या नात्यात निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी इंदू अधूला बाहेर फिरायला घेऊन जाते. दोघांनी एकत्र वेळ घालवावा, मनातील गैरसमज दूर व्हावेत, हा तिचा हेतू असतो; पण तिथे घडणारी घटना त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणारी ठरते.
दिग्रासकर घराण्यात आजवर न घडलेली, धक्कादायक घटना घडते आणि घरातील एका सदस्यावर खुनाचा आरोप दाखल होतो. अधोक्षजला खुनाच्या आरोपाखाली अटक होते आणि हा क्षण संपूर्ण कुटुंबासह प्रेक्षकांनाही हादरवून टाकणारा ठरतो. इंदू आणि अधोक्षजच्या संसारावर जणू ग्रहण लागल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. बाहेर गेले असताना नेमकं काय घडलं? कोणाच्या खुनाच्या आरोपात अधोक्षज अडकला? हा सगळा प्रकार श्रीकलाच्या धोकादायक कटाचा भाग आहे की नकळत घडलेला गंभीर गुन्हा? या सगळ्यामागचं सत्य काय, हे उलगडण्यासाठी प्रेक्षकांना थरारक क्षणांचा सामना करावा लागणार आहे. प्रेम, विश्वास, कटकारस्थान आणि न्यायाच्या शोधाची ही उत्कंठावर्धक कथा पुढे कोणतं वळण घेणार, हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहा ‘इंद्रायणी’, महारविवार, २१ डिसेंबर, संध्या ७ वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.