(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील तारिणी मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहे. ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेतील सतत येणारे नवे ट्विस्ट आणि भावनिक वळणं यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता टिकून आहे. तारिणीचा धाडसी स्वभाव, केदारची तिला मिळणारी ठाम साथ, आजीचा समजूतदारपणा आणि इतर कुटुंबीयांचा तारिणीविषयी असलेला राग आणि तिरस्कार यामुळे कथानक अधिक प्रभावी ठरत आहे. तारिणी मालिकेत आता एक मोठा खुलासा झाला आहे. केदार हा दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे, हे सत्य समोर आल्यानंतर कथेला नवं वळण मिळालं आहे. यानंतर केदारला घरात आणण्याचं वचन कौशिकीने दयानंद खांडेकरांना दिलं असून, त्यानुसार ती केदारकडे जाऊन बोलताना पाहायला मिळणार आहे.
याचदरम्यान, तारिणीला एका महत्त्वाच्या केससंदर्भात माहिती फक्त खांडेकरांच्या घरातूनच मिळू शकते, असे समजते. त्यामुळे त्या माहितीपर्यंत पोहोचण्यासाठी केदार आणि तारिणी खांडेकर कुटुंबात पती-पत्नी म्हणून प्रवेश करण्याचा निर्णय घेतात.
जेव्हा केदार तारिणीला सोबत घेऊन खांडेकरांच्या घरी येतो आणि आम्ही लग्न केले आहे, असे जाहीर करतो, तेव्हा घरात एकच खळबळ उडते. इतकेच नव्हे, तर तारिणीला घरात प्रवेश न दिल्यास आपणही घरात पाऊल टाकणार नाही, असा ठाम निर्णय तो घेतो. या सगळ्या घडामोडींमध्ये मात्र तारिणीवर अनेक आरोप केले जातात आणि तिला संधीसाधू असल्याचेही म्हटले जाते.
श्रीमंतांच्या घरात सून म्हणून येण्यासाठीच तिने केदारशी लग्न केल्याचे आरोप तारिणीवर केले जातात. आता समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये तारिणीची सावत्र आई आणि आत्या तिला त्या घरातून बाहेर नेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे दिसते. इतकंच नव्हे, तर तिच्या कुटुंबात जिच्याशी ती सर्वांत जवळ आहे ती आजीदेखील तारिणीच्या या निर्णयामुळे तिच्यापासून दुरावणार का, असा मोठा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.
झी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. तारिणीची सावत्र आई घरात खांडेकरांच्या घरात येते, आणि ती तारिणीवर हात उचलून म्हणते की, ही मुलगी निर्लज्जपणाचा कळस आहे. ते पाहून केदार येतो आणि तो तारिणीच्या आईचा हात धरूतो आणि स्पष्ट शब्दात सांगतो की, तारिणी माझी बायको आहे आणि माझ्या बायकोवर हात उचलेला मला चालणार नाही. मी खपवून घेणार नाही.
तेवढ्यात तारिणीची आत्या तिथे येते आणि म्हणते की, ही अशी ऐकणार नाही. हिला फरफटत बाहेर काढायला हवं, असे म्हणत ती तारिणीचा हात धरून तिला खेचत बाहेर नेते, ते पाहून कौशिकी तिथे येते आणि तिला अडवते. हा प्रोमो शेअर करताना झी मराठीने तारिणीच्या एक निर्णयामुळे नवी नाती जोडताना, जवळची नाती दुरावणार, असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान या मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






