
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ यामध्ये लवकरच समाजसुधारणेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या लढ्यात मोलाची भूमिका बजावणारे क्रांतीगुरु लहुजी वस्ताद आता मालिकेत दाखल होणार आहेत. जोतीराव फुले आणि लहुजी वस्ताद यांचं प्रेरणादायी नातं आता मालिकेमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दहशत अन् भीतीने भरलेले चेहरे, आणखी एक थरारक कथेची झलक; The Kerala Story 2 चे मोशन पोस्टर रिलीज
लहुजी वस्ताद अर्थात लहुजी राघोजी साळवे यांनी १८२२ साली ब्रिटिश सत्तेच्या विरोधात संघर्ष उभारण्यासाठी पुण्यात तालीम सुरू केली होती. या तालमीतून अनेक तरुणांना लष्करी आणि शस्त्र प्रशिक्षण देण्यात येत होते. याच तालमीत शिक्षण घेण्यासाठी जोतीराव फुले नियमित येत असत. त्यामुळे जोतीराव फुले आणि लहुजी वस्ताद यांचं नातं केवळ गुरु-शिष्यापुरतं मर्यादित न राहता, विचार, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाचं प्रतीक बनलं. आता हाच अनुभव प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर घेता येणार आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली, तेव्हा समाजाकडून त्यांना तीव्र विरोध सहन करावा लागला. अशा कठीण काळात लहुजी वस्ताद खंबीरपणे फुले दाम्पत्याच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या पाठबळामुळेच फुले दाम्पत्याला स्त्री शिक्षणाचा प्रचार-प्रसार करता आला. अस्पृश्य समाजाला शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठीही लहुजी वस्ताद यांनी मोलाचे प्रयत्न केले.
मालिकेत लहुजी वस्ताद यांच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते विश्वजीत फडते झळकणार असून, त्यांच्या दमदार अभिनयामुळे हा ऐतिहासिक टप्पा अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. लहुजी वस्ताद आणि जोतीराव फुले यांचं नातं हे केवळ इतिहासाचा भाग न राहता, सामाजिक परिवर्तनाच्या प्रवासातील एक प्रेरणादायी पर्व म्हणून मालिकेत सादर केलं जाणार आहे. हा महत्त्वाचा इतिहास अनुभवण्यासाठी ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ दररोज सायंकाळी ७.३० वाजता, स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना पाहावा लागणार आहे.